
शरद पवारांच्या कबुलीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या जर…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन गटात फाटाफूट झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पक्षाचे काही आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्यास इच्छूक असल्याची कबुली शरद पवारांनी गुरूवारी दिली.
यानंतर सुप्रिया सुळे यांनी “जर शरद पवार साहेब याबद्दल बोलले असतील, तर मी याच्याबाबत काय बोलणार,” असे म्हणत माध्यमांच्या प्रश्नाला बगल दिली.
आज साताऱ्यात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६६ वी पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच मंत्री मकरंद पाटील, आमदार रोहित पवार, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सर्व नेत्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन करून राज्यातील उत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार केला. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोन मतप्रवाह आणि शरद पवार यांची जाहीर कबुली याबाबत त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, “मला याची काहीच कल्पना नाही, मी काल दिल्लीला असल्याने मला याबाबत काहीही माहिती नाही. जर शरद पवार साहेब याबद्दल बोलले असतील, तर मी याच्याबाबत काय बोलणार. मी जोपर्यंत माहिती घेत नाही, तोपर्यंत भाष्य करू शकत नाही. सगळ्यांशी चर्चा करून मी बोलेन.
शरद पवार काय म्हणाले?
पुन्हा एकत्र येण्याबाबत पक्षात दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे मान्य करतानाच आपला पक्ष इंडिया आघाडीसोबतच राहील आणि भाजपविरोधात लढत राहील, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली आहे. एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत पवारांना या विषयावर प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ही भूमिका मांडली. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, संसदेत विरोधी पक्षात बसायचे कि नाही याचा निर्णय तिने घ्यायचा आहे, असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पवार यांनी सुप्रिया सुळे यांना दिल्याचे संकेत त्यांच्या या उत्तराने गेल्याने दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा चर्चाना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.