
काँग्रेसचे शंभराहून अधिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अजित पवार यांना नांदेड जिल्ह्यात वारंवार यावे लागेल, असा दावा केला होता. त्यानुसार उद्या (ता.11) ते आपल्या तिसऱ्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत.
यावेळी काँग्रेसचे शंभरहून अधिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. चिखलीकर यांनी या संदर्भात माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधार मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले. ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने तात्काळ त्यांना उमेदवारी जाहीर केले आणि ते निवडून आले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभेत यश मिळवलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी मग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नंबर एकचा पक्ष करण्याचा निर्धार केला.
या दिशेने वाटचाल करताना चिखलीकर यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात सुरूंग लावला. चार माजी आमदारांसह शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला. यात भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांचाही समावेश आहे. या प्रवेश सोहळ्याच्या भाषणातच चिखलीकर यांनी अजित पवार यांना तुम्हाला वारंवार जिल्ह्यात दौरे करावे लागतील, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचा दावा केला होता.
आपला दावा खरा करून दाखवत आता अजित पवारांच्या तिसऱ्या नांदेड जिल्हा दौऱ्याची जोरदार तयारी चिखलीकर आणि त्यांच्या समर्थकांनी केली आहे. काँग्रेसचे शेषराव चव्हाण यांच्यासह अनेक जिल्हा परिषद सदस्य व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच दौऱ्यात काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियाचीही अजित पवार हे चव्हाण वाडी येथे सात्वंन भेट घेणार असल्याचे चिखलीकर यांनी सांगितले.
एकत्र आले तर आनंदच..
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत, या संदर्भात चिखलीकर यांना विचारले असता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला आनंदच होईल, असे ते म्हणाले. या विषयावर अधिकृत अजून कोणीही काही बोलले नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर राज्यात आणि नांदेड जिल्ह्यात आमची ताकद निश्चितच वाढेल. आमच्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, ही माझी वैयक्तिक इच्छा असल्याचेही चिखलीकर म्हणाले.