
दंगली घडवणाऱ्या नवहिंदूंवर खासदार लंकेंचा घणाघात…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरमधील खासदार नीलेश लंके यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत, विधानसभा निवडणुकांविषयी शंका उपस्थित केली आहे.
विधानसभा निवडणूक संशयास्पद झाली. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून ईव्हीएम मशिन मॅनेज करण्यात आले. त्याला प्रगत देशाने दुजोरा दिला आहे”, असा घणाघात खासदार नीलेश लंके यांनी केला.
राहुरीमधील केंदळ बुद्रुक इथं ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी खासदार लंके ईव्हीएम (EVM)मशिनवरील मतदानावर बोलताना, हिंदुत्वावरून महायुती सरकारला चांगलेच सुनावले.
खासदार लंके म्हणाले, “राहुरीच्या इतिहासात सर्वांत जास्त काम करणारे आमदार म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाहिले जाते. ते मनमिळाऊ, कुणाला नाराज न करणारे आहेत. पाच वर्षांत त्यांनी कोणत्याही बाजुने चुका केल्या नाहीत, तरी विधानसभा निवडणुकीत (Election) वेगळे घडले. ते कसे घडले, सगळ्यांना माहिती आहे. सगळे संशयास्पद आहे.
आजपर्यंत राजकीय मंडळी ‘ईव्हीएम’विषयी शंका व्यक्त करीत होते. आता गुरांमागे जाणारेसुद्धा मशीनमध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे, असे म्हणत आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या रूढी परंपरा जपणारी माणसं आहोत. आम्हाला कुणी हिंदुत्व शिकविण्याची गरज नाही. जातींमध्ये दंगल घडवून समाजात तेढ निर्माण करणारे काही नवहिंदू तयार झाली आहेत, असेही खासदार लंके म्हणाले.
केंदळ बुद्रुक ग्रामपंचायतीची नवीन इमारत कामकाजासाठी सज्ज झाली आहे. या इमारतीतून ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांमार्फत गोरगरिबांची कामे मार्गी लागावीत, अशी अपेक्षा प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.