
भाजपा जिल्हाध्यक्ष पदावर बहुतांश ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षात कचखाऊ भूमिका घेणाऱ्या अनेकांना हटवण्याचे धाडसही पक्षाच्या नेतृत्वाने दाखवल्याचे दिसून आले आहे.
हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावर माजी आमदार गजानन घुगे यांची नियुक्ती करत पक्ष नेतृत्वाने भाकरी फिरवल्याची चर्चा आहे. तर मावळते जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांच्या नावावर फुली मारत त्यांना पुन्हा संधी नाकारली.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी (BJP) अंतर्गत विविध पदाधिकार्यांच्या निवड प्रक्रिया सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर यावेळी जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. मावळते जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनाच पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता काही जणांनी वर्तवली होती. परंतु लोकसभा निवडणुकीपासून फुलाजी शिंदे यांनी अनेक विषयांमध्ये दुटप्पी भूमिका घेतली, ती त्यांच्या अंगलट आली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून इच्छुक असलेल्या रामदास पाटील सुमठणकर यांना शिंदे यांनी विरोध केला होता. पक्षनिरीक्षकांच्या कानावर हा प्रकार घातल्यामुळे (Hingoli) हिंगोलीत जिल्हाध्यक्षपदावर दुसऱ्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन वेळा आमदार राहिलेल्या गजानन घुगे यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपवत पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी त्यांना सक्रीय केले आहे. पक्षाने विश्वास दर्शवल्यामुळे घुगे समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
हिंगोली आणि कळमनुरी विधानसभेत घुगे यांचा दांडगा जन संपर्क आहे. शिवाय संघटनेतील कामाचा घुगे यांचा अनुभव पक्षाला यश मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. घुगे यांच्या आक्रमक स्वभावमुळे काहीजणांची अडचणही होणार आहे. ओबीसी चेहरा म्हणून घुगे यांना पक्षाने जिल्हाध्यक्ष पदावर संधी दिल्याचे बोलले जाते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे घुगे यांनी म्हटले आहे.
भाजपामध्ये काम करताना पक्षाने दिलेली कामे चोख बजावली उपाध्यक्ष, राष्ट्रीय सदस्य तसेच लोकसभा, विधानसभा प्रभारी, इतरही राज्यात पक्षाने दिलेली कामे व्यवस्थित पार पाडली. माझ्या कामाची पावती म्हणून मला आज जिल्हाध्यक्ष पद मिळाले आहे. पक्षाने समाजातील सगळ्या घटकांसाठी केलेल्या कामाचा प्रचार आणि प्रसार करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणे हेच आपले ध्येय असेल, असेही घुगे यांनी स्पष्ट केले.