
वैष्णवी हगवणे प्रकरणावर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; कुटुंबाला म्हणाले ‘नुसतं घरी बसून…
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणावेत यासाठी सासरा राजेंद्र हगवणे आणि सासरच्यांनी वैष्णवीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला, ज्यामुळे तिने जीवन संपवलं.
दरम्यान पोलिसांनी कोर्टात तिच्या हत्येचाही संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी संपूर्ण हगवणे कुटुंबाला बेड्या ठोकल्या आहेत. घटना उघड झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी वैष्णवीच्या माहेरी कस्पटे कुटुंबाला भेट देण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्यातच आज बीडमधील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख कस्पटे कुटुंबाच्या भेटीसाठी पुण्यात पोहोचले होते.
पुण्यात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना त्या पावसातच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी इतर कुटुंबीयांसह कस्पटे कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्यांनी वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. तसंच हा लढा कायदेशीर प्रक्रियेने लढण्यासंदर्भात चर्चा केल्याचं समजत आहे. यावेळी त्यांनी वैष्णवीच्या आईचीही भेट घेतली. ही भेट सांत्वनपर असल्याची माहिती मिळत आहे. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांचे सुपुत्र विराज देशमुखही येथे भेटीसाठी पोहोचले होते.
धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सांगितलं की,आमचं आणि त्यांचं दुःख सारखं आहे. आमचाही माणूस गेला आहे. छोटं बाळ आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ दिलं पाहिजे. हे सगळे भोग आहेत भोगावे लागतात. कस्पटे कुटुंबांना ह्यातून पुढं यावं.
पुढे ते म्हणाले, खरी परीक्षा पुढं आहे, आपल्याला सिद्ध करावं लागणारआहे. योग्य दिशा शोधली पाहिजे. न्याय घरी बसून मिळत नाही . त्यासाठी रस्त्यावर यावं लागतं, उपोषण करावं लागतं. आमच्या भावान काय पाप केलं होतं? परंतु न्याय मागावा लागत आहे.
28 मेपर्यंत पोलीस कोठडी
सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, पोलिसांनी चार्जशीटमध्ये खूनाचा संशय व्यक्त केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. 23 मे रोजी पहाटे 4.30 वाजता दोघांना पोलिसांनी अटक केली.
अटक केल्यानंतर आज हगवणे बाप-लेकाला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी रिमांड कॉपीत हत्येचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.