
आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ प्रश्नांना शिंदेंचं उत्तर; म्हणाले मी स्वत…
मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. मान्सूनपूर्व पावसाने शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेले असताना सोमवारी थेट भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या वरळी- आरे भुयारी मेट्रो मार्गावरील वाहतूक आज पावसामुळे विस्कळीत झाली. वरळी स्थानक ते आचार्य अत्रे चौक स्थानक (वरळी नाका) सेवा ठप्प झाली असून तांत्रिक कारणामुळे मेट्रो सेवेवर परिणाम झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात शिरले. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पात पाणी शिरल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भुयारी मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास सोईस्कर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात ही अपेक्षा फोल ठरली आहे. वरळी मेट्रो स्थानकात पाणी साठून चिखल झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
अॅक्वा लाईन मेट्रो स्टेशनच्या अद्याप सुरू असलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आदित्य ठाकरे म्हणाले, “जर मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे, तर उद्घाटन कोणत्या आधारावर करण्यात आले ? आमच्या सरकारच्या काळात चार वर्षांपूर्वी हिंदमाता परिसर वॉटर लॉगिंग फ्री केला होता.
मात्र, आज भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेने कोणतीही पावसाळी तयारी केली नाही. एकाच पावसात संपूर्ण मुंबईला बुडवून टाकल्याचे वास्तव समोर आले आहे.असे म्हणत त्यांनी दादरच्या हिंदमाता परिसरात साचलेल्या पाण्याचा व्हिडिओही ट्विटरवरून शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
‘मी स्वत: कंट्रोल रुममध्ये’ – एकनाथ शिंदे
आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, “जर पाऊस १५ दिवस आधी आला, तर काही अडचणी येणं साहजिक आहे. आपण १० जूननंतर पावसाची तयारी करत असतो. मात्र, यावेळी मान्सूनने लवकर हजेरी लावली.
मी स्वतः कंट्रोल रूममधून सर्व भागांवर नजर ठेवतोय. अनेक ठिकाणी आता पाणी साचलेलं नाही. मुख्यमंत्री देखील सातत्याने यंत्रणांशी संपर्कात आहेत. सर्व यंत्रणा सतर्क आहेत आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्पष्ट केले.