
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा काय ?
काँग्रेसने सरदार पटेलांचं ऐकलं असतं तर आज 75 वर्षापासून सुरू असलेल्या दहशतवादी घटना झाल्याच नसत्या, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत.
यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करतानाच पाकिस्तानलाही गंभीर इशारे दिले आहेत. दहशतवाद ही पाकिस्तानची प्रीप्लान युद्धाची नीती आहे. देशाच्या सीमेपलिकडून आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.
दहशतवाद्यांच्या बळावर आणि मुजाहिदीनांच्या नावावर पाकिस्तानने भारताचा भाग बळकावला. त्याच दिवशी त्या मुजाहिदींनीना कंठस्नान घातलं असतं आणि सरदार पटेलांचं म्हणणं ऐकलं असतं तर आज 75 वर्षापासून सुरू असलेले दहशतवादी हल्ले पाहायला मिळाले नसते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गांधीनगरमध्ये जनसभेला संबोधित करताना मोदी यांनी हे विधान केलं.
मोदींच्या भाषणातील मुद्दे
6 मे रोजी रात्री जे लोक मारले गेले, त्यांना पाकिस्तानने स्टेट ऑनर दिलं. त्यांच्या ताबूतांवर पाकिस्तानचे झेंडे लावले. पाकिस्तानी सैन्यानेही त्या लोकांना सॅल्यूट केला. यावरून दहशतवादी हल्ले हे काही प्रॉक्सी वॉर नाहीत तर पाकिस्तानची ही ठरवून केलेली युद्धाची रणनीती आहे.
तुम्ही युद्धच करत आहात. त्यामुळे त्याला उत्तरही तसंच मिळेल.
यावेळी आम्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था ठेवली होती. कोणी पुरावे मागू नये याची ही खबरदारी होती.
1947मध्ये भारताचे तुकडे करण्यात आले. साखळ्या तोडायच्या होत्या. पण इथे तर बाहूच तोडण्यात आले. देशाचे तीन तुकडे करण्यात आले. त्याच रात्री काश्मीरमध्ये पहिला दहशतवादी हल्ला झाला.
विकास केल्यावर त्याचे चांगले परिणाम मिळतात हे आपण पाहिलं आहे. आम्ही रिव्हर फ्रंट बनवलं. आम्ही जगातील सर्वात मोठं स्टेडियम बनवलं. आम्ही स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं. आम्ही जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं.
काल 26 मे ही तारीख होती. मला 26 मे 2014 रोजी मला पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची संधी मिळाली. त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावर होती.
आम्ही कोरोनाच्या विरोधातील लढाई लढली. शेजारी देशांनाही झेललं. नैसर्गिक आपत्तीही सोसली. त्यानंतरही आपली अर्थव्यवस्था 11 व्या नंबरवरून चौथ्या नंबरवर आणण्याची किमया आम्ही केली आहे. कारण आम्हाला विकास हवा. प्रगती हवी आहे.
येत्या काळात आपल्याला पर्यटनावर भर दिला पाहिजे. गुजरातने तर कमाल केली आहे. कच्छच्या वाळवंटात जाण्याची हिंमत करेल असा विचार तरी करू शकाल का? आज त्याच कच्छछ्या वाळवंटात जाण्यासाठी बुकींग मिळत नाहीये. सर्व काही बदलता येऊ शकतं. फक्त इच्छा शक्ती हवी.