लग्न करण्यासाठी शारीरिक संबंध आणि धोका…
एका विवाहित महिलेकडून मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विवाहित महिलेने वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे.
या नोटीसमध्ये सिद्धांत यांनी माझी फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सामाजिक न्यायमंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने खळबळजनक आरोप केले आहेत.. विवाहित महिलेने नोटीसीमध्ये असे म्हटले आहे की, माझी आणि सिद्धांत शिरसाट यांची ओळख 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर आमच्यात रिलेशनशिपला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात आमच्या चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या. तसेच सिद्धांतने माझ्याबरोबर शारिरीक संबंध देखील ठेवले. त्यानंतर 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने आमच्या दोघांचं लग्न झालं. त्याची पुरावे देखील माझ्याकडे आहेत असं महिलेने म्हटल आहे.यापूर्वीचे वैवाहिक संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. पोलिसांकडे तक्रार केलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करुन टाकेन अशी धमकी देखील सिद्धांत शिरसाट यांनी दिल्याचे विवाहितेने म्हटलं आहे.
दरम्यान सिद्धांत शिरसाट यांच्याविरोधात महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांचे वडिल राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळे कारवाई झाली नाही, असा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे.सात दिवसांच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे, अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं वकील चंद्रकांत ठोंबर यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
