धक्कादायक नाव येणार समोर…
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाची निवड आज होणार आहे. आठवडाभरापूर्वी सर्वानुमते अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाले असताना पुन्हा एकदा गोकुळच्या राजकारणात मोठे हालचाली सुरू झाल्या आहेत.
कालपासून या घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने पुन्हा एकदा महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी नेत्यांच्यावर दबाव आणला जात असल्याची माहिती समोर येत आहे.
काल अचानक महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची गोकुळच्या अध्यक्ष पदासाठी जवळपास अडीच तास खलबत्त झाली. आज संचालक मंडळाच्या मीटिंग समोर धक्कादायक नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीचाच अध्यक्ष करण्यासाठी अजित नरके, नाविद मुश्रीफ, अमरीशसिंह घाटगे आणि अमर पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फडणवीस यांनी थेट फोन करून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना महायुतीचा अध्यक्ष करण्याच्या सूचना केल्याचे समजते. यामुळे नेत्यांचीही पंचाईत झाली असून, यापूर्वी अध्यक्षपदासाठी ठरलेले शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव मागे पडले आहे.
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महायुतीचा अध्यक्ष व्हावा, म्हणून राजीनामा देण्यास केलेल्या टाळाटाळ केल्यानंतर गोकुळच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांचे हे बंड तीन दिवसातच थंड झाले. त्यानंतर गोकुळ वरील अध्यक्षपदावर गोकुळचे संस्थापक अध्यक्ष कै.आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती होती. आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या मीटिंग समोर त्यांचे नाव समोर येणार होते. पण कालपासून अध्यक्ष महायुतीचाच व्हावा यासाठी राजकीय घडामोडी जोरात घडताना दिसत आहे.
शशिकांत पाटील-चुयेकर हे ‘गोकुळ’च्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहेत. ते अध्यक्ष झाले, तर काँग्रेसचा आणि पर्यायाने सतेज पाोटील यांचा अध्यक्ष होईल. त्यामुळेच महायुतीचाच अध्यक्ष करा, तो कोणीही असू दे, अशा सूचना फडणवीस यांनी मुश्रीफ यांना दिल्याचे समजते. जिल्हा बँकेत यासंदर्भात झालेल्या बैठकीतही नेत्यांच्या देहबोलीवरून काही तरी नवे घडत असल्याचे संकेत मिळत होते. त्यामुळेच चुयेकर यांचे नाव मागे पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अंबरिशसिंह घाटगे दावेदार
महायुतीचा अध्यक्ष करायचा झाल्यास अंबरिशसिंह घाटगे हे प्रबळ दावेदार समजले जातात. आमदार डॉ. विनय कोरे यांनी अमर यशवंत पाटील यांच्यासाठी आग्रह धरला आहे. पण, या नावावर नेत्यांचे एकमत अशक्य आहे. घाटगे सध्या भाजपसोबत आहेत, ते अध्यक्ष झाले, तर मुश्रीफ यांनाही काही अडचण नसेल. पण घाटगे हे विरोधी पॅनेलमधून विजयी झाले आहेत. ही त्यांच्यासमोरील मोठी अडचण आहे. त्यांच्या नावाला पसंती मिळते का? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. स्थानिक राजकारणात घाटगे- मुश्रीफ एकत्र आहेत. हे संदर्भ घाटगे यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येण्यास कारणीभूत आहे.
सेनेचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरु
काल झालेल्या बैठकीत अजित नरके, नाविद मुश्रीफ, अंबरिषसिंह घाटगे या तिघांच्या नावावर झाली आहे. एकाचे नाव आज होणाऱ्या संचालक मीटिंग पुढे ठेवण्यात येणार आहे. प्रामुख्याने शिवसेनेचाच अध्यक्ष करावा अशी मागणी काही नेत्यांची आहे. त्यामुळे अजित नरके यांचे देखील जोरात चर्चा सुरू आहे.


