
थेट शरद पवारांकडेच नाराजी बोलून दाखवणार; थोरले पवार भाकरी फिरवणार ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भूमिकेविरोधात नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पक्षातील अनेक युवा आमदार आणि कार्यकर्ते जयंत पाटील यांनी संघटनात्मक पातळीवर आपल्या जवळच्या लोकांनाच पदांवर नियुक्ती दिल्याचा आरोप करत असून त्यामुळे पक्षात अंतर्गत असंतोष निर्माण झाल्याचे समजते.
जयंत पाटील यांनी पक्षात संघटनात्मक फेरबदल करताना अनेक महत्त्वाची पदं आपल्या विश्वासू आणि निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे पक्षातील इतर अनुभवी, कार्यक्षम आणि निष्ठावान लोकांना संधी मिळत नसल्याचं मत नाराज आमदारांनी व्यक्त केलं आहे. विशेषतः युवा आमदारांमध्ये ही नाराजी अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.
शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचणार नाराजीचा आवाज
सूत्रांच्या माहितीनुसार, हे नाराज आमदार आपली नाराजी थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत आहेत. ही वाढती नाराजी लक्षात घेता नुकतीच शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते. नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षातील गोंधळ मिटवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
वर्धापनदिनापूर्वी पक्षात अंतर्गत बदल होण्याची शक्यता
त्याआधीच पक्षात काही महत्त्वाचे अंतर्गत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये काही नवीन नियुक्त्या, जबाबदाऱ्या बदलण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेमके कोणते बदल होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावरून अजित पवार गटात मतभेद?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावरून अजित पवार गटात मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही नेते या विलिनीकरणाला पाठिंबा देत असले तरी, दुसऱ्या एका गटाचा याला तीव्र विरोध आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे विलिनीकरणास विरोध करणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी आहेत. प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चर्चा सध्या सुरु आहे. अशा परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी गटांचे एकत्र येणे हा त्यांच्यासाठी राजकीय धोका ठरू शकतो. त्यामुळेच ते या विलिनीकरणास विरोध करत असल्याचं बोललं जात आहे.