राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाने चौफेर टीका झाली होती.
अशातच आता अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे विधान कृषिमंत्र्यांनी केलंय. ज्यावरुन नवा वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय की, माणिकराव कोकाटे यांना असे वक्तव्य करून अंगावर घेऊ नका, असा सल्ला दिला होता. पण त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे सरकारची देखील बदनामी होते, असंही शिरसाट यांनी म्हटलंय. आज संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
मागील काही दिवसांपासून अवकाळीने थैमान घातलंय. शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात गेली आहेत. त्यांच्या तोंडचं पाणी पळाल्याचं दिसत आहे. यावरून मात्र चांगलंच राजकारण रंगत असल्याचं दिसत आहे. वादग्रस्त विधानानंतर माणिकराव कोकाटे यांनी युटर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय. मी तसे बोललोच नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला, असं स्पष्टीकरण कोकाटे देत आहेत. ज्याठिकाणी पिक नाही, त्याचे काय पंचनामे करणार? जिथे काहीच नाही त्याचे पंचनामे करता येत नाही. हे मी जे खरे आहे, ते बोललो त्यात गैर काय? असंही कोकाटे यांनी म्हटलंय.
माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय की, जे बोललो ते खरंच बोललो. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला आहे. कांदे जे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्यांचे पंचनामे होणार नसल्याचं देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. घरात आणलेल्या पिकांचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमांत बसत नाही. शेतात जे पिके असतील, त्यांचे पंचनामे रितसर होतील, असं देखील कोकाटे यांनी स्पष्ट केलंय. तर शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी लागेल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.


