
भारताचे सरन्यायाधीश (CJI) बी. आर. गवई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा करताना त्यांना देशातील “सर्वात शक्तिशाली आणि मेहनती मुख्यमंत्री असल्याचे म्हटले
प्रयागराज येथील उच्च न्यायालयात 680 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवनिर्मित अधिवक्ता चेंबर इमारती व मल्टीलेव्हल पार्किंगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सरन्यायाधीश म्हणाले, “योगीजी हे देशातील सर्वात शक्तिशाली मुख्यमंत्री आहेत, असं केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी म्हटलं आणि मी हे देखील म्हणतो की अलाहाबाद ही शक्तिशाली व्यक्तींची भूमी आहे.”
संविधानामुळे देश एकजूट राहिला ः सरन्यायाधीश
बी. आर. गवई यांनी भारतीय संविधानाचे 75 वर्षांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, “जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले, तेव्हा संविधानाच्या जोरावर देश एकजूट आणि मजबूत राहिला.
न्यायपालिका, कार्यपालिका आणि संसद या तीनही स्तंभांनी सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संपत्तीचे पुनर्वाटप करणारे अनेक कायदे आणले गेले, जमींदारांकडून जमीन घेऊन भूमिहीनांना देण्यात आली.
मुलभूत हक्क आणि नीति निर्देशक तत्वे – संविधानाची दोन चाके
गवई यांनी 1973 च्या ऐतिहासिक 13 न्यायाधीशांच्या घटनात्मक खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख करत म्हटले की, “मुलभूत हक्क आणि नीति निर्देशक तत्वे ही संविधानाच्या आत्म्याची दोन चाके आहेत. यातील एखादं चाक थांबलं, तर संविधानाचा रथच थांबेल.
बार आणि बेंच हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत. दोघेही एकत्र काम केल्याशिवाय न्यायप्रक्रियेचा रथ पुढे जाऊ शकत नाही.”
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिवक्त्यांच्या कल्याणासाठी सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “सात जिल्ह्यांमध्ये नवीन न्यायालयीन संकुल उभारण्यासाठी 1700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अधिवक्ता निधी ₹1.5 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवली. पात्र अधिवक्त्यांची वयमर्यादा 60 वरून 70 वर्षे केली आहे. या योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती योगींनी दिली.
प्रयागराज महाकुंभच्या यशस्वी आयोजनात उच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकल्पावर स्थगिती न लावल्यामुळे सरकारला कामे पार पाडता आली, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.
उच्च न्यायालयाच्या इमारतीची वैशिष्ट्ये
प्रयागराज उच्च न्यायालयात बांधण्यात आलेल्या इमारतीत खालील सुविधा आहेत:
3835 वाहनांसाठी पार्किंग क्षमता
2366 वकील चेंबर्स
14 मजली इमारत, ज्यातील 5 मजले पार्किंगसाठी, 6 मजले चेंबर्ससाठी
26 लिफ्ट्स, 28 एस्कलेटर आणि 4 ट्रॅवलेटर्स
दरम्यान, या उद्घाटन समारंभात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, विक्रम नाथ, जे. के. माहेश्वरी, पंकज मिथल, मनोज मिश्रा तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण भंसाली उपस्थित होते.