जाणून घ्या; नेमकं काय म्हटलं ?
भारतात प्रचंड विविधता आहे. प्रत्येकाचे खानपाण, वेशभूषा, चालिरिती वेगळे आहे. एवढेच काय तर देविदेवता व पूजा पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत.
या सर्व वरवरच्या गोष्टी आहेत. मात्र आपले सर्वांचे मूळ एकच आहे. त्यामुळे येथे प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार आणि रितिरिवाजानुसार आपले सणवार साजरे करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट मत सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
भारत-पाकिस्तान युद्ध आणि ईद तसेच कुर्बानीवरून विविध प्रकारची भडक विधानं आणि आपली मतं व्यक्त करून वातावरण कलुषित करणाऱ्या भाजपच्या काही अतिउत्साही नेत्यांना सरसंघचालकांनी एकप्रकारे आपल्या भाषणातून इशाराच दिला असल्याचे मानल्या जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी सरसंघचालक भागवत म्हणाले, आपण सर्व देशाच्या सनातनी संस्कृतीतून प्रवाहित झालो आहोत. भौगोलिक वातावरण आणि परिस्थितीनुसार प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. कोणी कुठल्या धर्मावर विश्वास ठेवायचा, पूजा करायची, पुजेची पद्धती काय असावी हे ज्याचे त्याचे त्याला ठरवण्याचा अधिकार आहे. आमची येशू आणि मोहम्मद पैगंबर यांच्यावरही श्रद्धा आहे. मात्र ब्रिटीशांनी आपल्यात भ्रम निर्माण केला.
तुमचा वंश एक, संस्कृती आणि धर्म एक नाही असे बिंबवले. त्यामुळे आपण सर्व एक असल्याचा आपल्याला विसर पडला. याचे भान प्रत्येकाने ठेवायची गरज आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे हेच प्रयोजन आहे. प्रत्येकाने आपल्या देशातील विविधतेचा सन्मान करावा आणि स्वीकार करावा असा सल्लाही त्यांनी या प्रसंगी दिला.
”विविधतेचे फायदे आहे तेवढेच तोटेही आहे. सर्वांना एकसमान धाग्यात बांधणे अवघड आहे. त्यामुळे वादविवाद होणे, असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र देशहित लक्षात घेता भावातिरेक करणे, आपसात भांडणे करणे आणि स्फोटक प्रतिक्रिया व्यक्त करून जाती-धर्मात तेढ निर्माण करणे अयोग्य आहे. पारतंत्र्यात असताना आक्रमक बोलणे गरजेचे होते मात्र आता आपण आपल्या देशात आहोत. आपले संविधान आहे. कायदेही आपलेच आहेत.
त्यामुळे प्रत्येकाने थंड डोक्याने विचार करावा, स्वार्थी व आपसात भांडणे लावणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. देशहित पहिले हे ध्यानात ठेवावे. आपल्याला कोणाशी युद्ध करायचे नाही. मात्र कोणी कुरापती करत असेल, देश तोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपणही सज्ज राहणे आवश्यक आहे. आता युद्धाची पद्धत बदलली आहे. तलावारीने कोणी युद्ध करीत नाही. थेट घरबसून इतर देशांवर हल्ला करता येतो. पाकिस्तानचे अतिरेक्यांचा वापर करून आपल्या विरोधात युद्धा आधीपासूनच छेडले आहे. या सर्वांचा सामना फक्त शस्त्राने किंवा सैन्याने करता येत नाही. त्यासाठी समाजात एकी असणे आणि देशभक्तीची भावना असणे आवश्यक आहे. हीच सशक्त देशाची ताकद असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.


