केंद्रीय मंत्र्याचा शरद पवारांना टोला !
राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आली आहे. केंद्रात भाजपला सत्तेत येऊन 11 वर्ष होत आहेत. तर राज्यात महायुतीची दुसरी टर्म आहे. पण या सत्तेच्या समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद यांचा वाटा मोठा असल्याचा दावाच भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने केल्याने आता राज्यात खळबळ उडाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांबाबत हे विधान केले आहे. ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
प्रतापराव जाधव यांनी, राज्यात भाजपप्रणीत महायुतीचे सरकार आणण्यात शरद पवार यांचा, ‘सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा’, असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ते बुलडाण्यात माध्यमांशी बोलत होते. तसेच प्रतापराव जाधव यांनी, शरद पवार यांनी अनेकदा भाजपला मदत केली आहे. पण आता ते देशात मी कसा मोठा विरोधक आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोपही केला आहे.
जाधव यांनी पवार यांच्यावर टीका करताना, ‘2014 साली राज्यात भाजपचे सरकार आले. पण यावेळी शरद पवारसाहेबांचा महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळेच त्यांचा यात सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा आहे. भाजपला अनेकदा पवारसाहेबांनी मदत केली आहे. मात्र आता ते घुमजाव करत आहेत. स्वत:ला आपण विरोध असल्याचे भासवत आहेत. पण त्यांचा हा प्रयत्न फक्त त्यांच्यासह आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी सुरू असल्याचा टोला देखील प्रतापराव जाधव यांनी लगावला आहे.
यावेळी प्रतापराव जाधव यांनी काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली आहे, ‘राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आता दारूचे दर कमी करण्याची घाई लागली आहे. त्यांचे तसे म्हणणे असेल तर आपण स्वत: त्याबाबत सरकारला निवेदन देण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.
रायगडवर झालेल्या पूजेबाबत प्रश्न केला असता त्यांनी, आपल्या हिंदू धर्माप्रमाणे पूजा करता येते. तर ती कोणी कुठे कशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तशीच पूजा जर रायगडमध्ये झाली असेल तर त्यात गैर काय?’ असाही सवाल प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केला आहे.
