भाजप आमदार बबन लोणीकर यांनी एका समारंभात वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. मात्र लोणीकर आपल्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागण्यास त्यांनी नकार दिला आहे.
भाजप आमदार लोणीकर यांनी एका समारंभात शेतकऱ्यांना जमिनीची पेरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपये दिले आहेत. तुमच्या घरच्या महिला आणि इतरांना लाडकी बहीण योजनांपासून तर आर्थिक लाभ हे मोदी यांच्यामुळे मिळत आहेत. यांसह अनेक आक्षेपार्ह विधाने केली होती.
यावर राजकारणात अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी लोणीकर यांना धडा शिकवणार असे जाहीर केले आहे. राजकीय पक्षांनी देखील या निमित्ताने भाजप आणि महायुती सरकारवर कठोर शब्दात टीका केली.
भाजपा आमदार लोणीकर यांचे विधान बुमरँग झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप केला. लोणीकर यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे. त्याबद्दल त्यांना कडक शब्दात समज दिली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लोणीकर नरमतील असे वाटले होते. मात्र लोणीकर यांनी माफी मागणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले आहे. बबन लोणीकर यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज दिली आहे. हे चांगले केले अशा सूचक शब्दात त्यांनी लोणीकर यांचा समाचार घेतला आहे. या सर्व घडामोडी आणि लोणीकर यांच्या वक्तव्यावर मी अधिक खुलासेवार मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान आमदार लोणीकर यांनी केलेल्या विधानावर सामान्य नागरिकांत सध्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. समाज माध्यमांवर देखील आमदार लोणीकर यांचा चांगल्यात समाचार घेतला जात आहे.
लोणीकर यांनी केलेले विधान म्हणजे जणू त्यांनी स्वतःच्या खिशातून जनतेला पैसे वाटप केले की काय? अशी विचारणा होऊ लागली आहे. सध्या विरोधक शांत असताना सत्ताधारी पक्षाचेच नेते आणि आमदार विरोधकांना दारूगोळा पूर्वत असल्याचे चित्र आहे. महायुती सरकार साठी तो चिंतेचा विषय बनत आहे.
