दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव/भूम, ता. ३० (प्रतिनिधी) – भूम शहरातील नागरिकांना दररोज शुद्ध, नियमित आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा व्हावा, तसेच हद्दवाढ भागांनाही नळजोडण्या मिळाव्यात, यासाठी ‘अमृत 2.0’ योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी पाणी कृती समितीच्या वतीने ३० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनाच्या अनुषंगाने, दिनांक ३ जुलै रोजी (गुरुवार) भूम शहरात ‘अमृत योजना बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी कोणत्याही प्रकारचा बंद किंवा रस्ता रोको न करता, पूर्णतः शांततामय व लोकशाही मार्गाने नागरिकांचा सहभाग असणार आहे.
अमृत 2.0 ही योजना शहराच्या जलसंपदेसाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या भूम शहरातील अनेक भागात पाणी कमी दाबाने येते किंवा अपुरा पाणीपुरवठा होतो. तसेच हद्दवाढ भागांतील नागरिकांना अद्याप नळजोडण्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या योजनेची तात्काळ अंमलबजावणी गरजेची असल्याचे समितीने स्पष्ट केले.
पण काही राजकीय हितसंबंध असलेले विरोधक योजनेत अडथळे आणत आहेत, असा आरोप समितीने केला आहे. त्यामुळे प्रशासनाने पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने ही योजना तात्काळ सुरू करून पूर्णत्वास न्यावी, अशी ठाम भूमिका कृती समितीने मांडली.
रॅली सकाळी ११ वाजता मेहंतीशावली मैदानातून सुरु होईल व वीर सावरकर चौक, महात्मा गांधी चौक, नागोबा चौक, ओंकार चौक मार्गे गोलाई चौक येथे सभेद्वारे समारोप होईल.
या रॅलीचे नेतृत्व पाणी कृती समितीचे अध्यक्ष दिलीप गाढवे व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे करणार आहेत. त्यांच्या सोबत ॲड. पंडित ढगे, डॉ. रामराव कोकाटे, रोहन जाधव, नारायण वरवडे, भागवत शिंदे, रंजीत साळुंखे, अमोल भोसले, प्रभाकर हाके, पोपट जाधव, योगेश आसलकर, तौफिक कुरेशी, संजय होळकर, अरुण देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पाणी कृती समितीने स्पष्ट केले की ही रॅली कोणत्याही पक्षाविरोधात नसून फक्त नागरिकांच्या पाण्याच्या मूलभूत हक्कासाठी आहे. भूममधील सर्व सुजाण नागरिकांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.