
मनसे-ठाकरेंच्या प्रमुख नेत्यांमध्ये रात्री उशिरा बैठक !
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय रद्द केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा ५ जुलै रोजी होणाऱ्या नियोजित मोर्चाचे आता विजयी मेळाव्यात रूपांतरित झाले आहे.
हा मेळावा वरळीतील डोम सभागृहात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काल ३० जून रोजी मनसे आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली.
मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची काल रात्री उशिरा बैठक पार पडली. सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल, हे ठरवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वरळीच्या डोम सभागृहात विजयी मेळावा होणार असल्याने या कार्यक्रमाची वेळ काय असणार, कोण कोण पाहुणे उपस्थित राहणार याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात कोण कोणाचे भाषण होईल, याबद्दलही सखोल चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात केवळ दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीच भाषणे होण्याची शक्यता आहे.
त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोधकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने १६ एप्रिल आणि १७ जूनचे त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. यानंतर तात्काळ मनसे आणि ठाकरे गटाचा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला. यानंतर खासदार संजय राऊत यांनी ५ जुलैला मोर्चा काढण्याऐवजी एकत्र विजयी सभा होईल, असे जाहीर केले होते.
त्यानुसार, आता ही विजयी सभा वरळी येथील डोम सभागृहात होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ वृत्तपत्राने याला ‘मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रचंड विजय’ असे संबोधत, ५ जुलैला ‘मराठी विजय दिवस’ साजरा केला जाणार असल्याचे नमूद केले आहे.
राजकारणात नवा बदल होणार का?
या मेळाव्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काल रात्री झालेल्या बैठकीमुळे या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मराठीच्या मुद्द्यावर सध्या दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आले आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या विजयी सभेकडे लागले आहे. तसेच यामुळे राजकारणात नवा बदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.