
शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची भावना; बैठकीत काय घडलं !
पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलं आणि राज्य सरकारनं अखेर जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र हिंदीआडून आपल्यालाच अडचणीत आणण्यात आल्याची भावना शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येते आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये मराठीचा मुद्द्यावर चर्चा झाली. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणल्याचं मत शिशिर शिंदेंनी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात शिंदेंची सेना मैदानात उतरली आहे.
ठाकरे गटाला प्रत्युत्तर द्या; एकनाथ शिंदेंच्या सूचना
हिंदींच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत चर्चा केली. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर द्या अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात. तसचं हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं सर्वांपर्यंत पोहोचवा असे आदेशही शिंदेंनी दिलेत.
दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊ नये, असा कोणताच जीआर काढला नव्हता- देवेंद्र फडणवीस
मराठी शक्ती एकत्र येऊ नये, असा सरकारचा कुटील डाव होता म्हणून राज्य सरकारनं हिंदीबाबतचे जीआऱ रद्द केले, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. तर उद्धव ठाकरेंचा या आरोपांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही जीआर राज्य सरकारनं मागे घेतले. दोन्ही ठाकरे बंधूंचा हा एकत्रित विजय असल्याची सर्वत्र चर्चा आहे. आणि त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र 5 जुलैला विजयी मेळावा देखील साजरा करणार आहेत. दरम्यान जीआर रद्द झाला असले तरी आता नवीन राजकारण सुरू झालंय. मराठी ताकद एकत्र येऊ नये हा सरकारचा कुटील डाव होता. आणि म्हणूनच जीआर रद्द करावा लागला, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊ नये, असा कोणताच जीआर काढला नव्हता अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.