
मोदी, शाह, फडणवीसांना टॅग करत संजय राऊतांनी डिवचले !
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी सुरु आहेत. त्यातच येत्या ५ जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडत आहे. वरळीतील डोम सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे.
या मेळाव्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग करत गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र असे म्हटले आहे. आता संजय राऊत यांनी या ट्वीटमागील अर्थ सांगितला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांना त्यांनी सकाळी केलेल्या ट्वीटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. हा विजय या महाराष्ट्र दृष्टांवरचा विजय प्राप्त आहे त्यामुळे आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला, असे संजय राऊतांनी म्हटले.
टायगर अभी जगह जगह पे जिंदा है
शिवसेना आणि शिवसेनेचे वाघ अजून जिवंत आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शाह गृहमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या तिघांनी मिळून शिवसेना तोडली. म्हणजेच महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी ट्वीट करत सांगितलं की आम्ही अजून आहोत. टायगर अभी जगह जगह पे जिंदा है. ५ जुलैला मराठी विजय दिवसाचे आम्ही त्यांनाही आमंत्रण देणार आहेत. तेव्हा त्यांनीही पाहावं की हा विजयी सोहळा नेमका काय आहे. मराठी भाषेसंदर्भात किंवा हिंदी सक्तीसंदर्भात मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त केला, हा विजय या महाराष्ट्र दृष्टांवरचा विजय प्राप्त आहे त्यामुळे आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला’, असे संजय राऊत म्हणाले.
आम्ही उभे राहणार, लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार
‘शत्रूला कधीही प्रिय म्हटलं पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आहे की शत्रू हा तोलामोलाचा असला पाहिजे. महाराष्ट्राच्या दुश्मनांना आम्ही महाराष्ट्राची एकजूट दाखवली. असे दुश्मन जेव्हा समोर असतील, तेव्हा आम्हाला लढाईला, संघर्ष करायला राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आम्हाला लढायला मज्जा येते. आम्ही लढणारे लोक आहेत. त्यांना असं वाटलं असेल की महाराष्ट्र कोलमडून गेला किंवा शिवसेना कोलमडून गेली, अजिबात नाही. आम्ही उभे राहणार, लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार’, असेही संजय राऊत म्हणाले.