नराधमांना पकडण्यासाठी पोलिसांची १० पथकं तैनात; स्केचही तयार !
पुण्याजवळील दौंड परिसरात पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोवर मध्यरात्री लुटीची आणि एक अत्यंत गंभीर प्रकार घडल्याची घटना उघड झाली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी टेम्पो थांबवून वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, महिलांचे दागिने हिसकावले, तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची दहा विशेष पथके सक्रिय झाली आहेत.
घटना कशी घडली?
३० जूनच्या मध्यरात्री पंढरपूरच्या दिशेने निघालेला वारकऱ्यांचा टेम्पो पहाटे साडेचारच्या सुमारास दौंडजवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक टेम्पोतील लोकांवर मिरची पूड फेकली आणि कोयत्याचा धाक दाखवत महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले.
या गोंधळाच्या वातावरणात, आरोपींनी वारकऱ्यांच्या गटातील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वेगळ्या जागी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, तिच्या वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तिच्या प्रकृतीबाबत पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य काळजी घेतली जात आहे.
तपासाला गती; आरोपींचे स्केच तयार
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत गुन्हा दाखल केला असून, दोन्ही अज्ञात आरोपींचे स्केच तयार करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील पूर्वीचे सराईत गुन्हेगार आणि संशयित व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. आरोपींचा लवकरात लवकर माग काढून कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वारीसारख्या शांत, भक्तिपूर्ण प्रवासात घडलेली ही घटना अत्यंत दुःखद आणि चिंताजनक असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि वारी आयोजन समित्यांकडून भाविकांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
