दैनिक चालु वार्ता कोल्हापूर/ चंदगड -संदिप कांबळे
चंदगड/ प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील शक्तिपीठांना जोडणारा व पुढे गोव्याला जाणारा शक्तिपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून जावा, जेणे करून चंदगड तालुक्याच्या विकासासाठी हातभार लागेल. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. अनिल गायकवाड यांची मुंबई येथे भेट घेतली व त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी शक्तिपीठ महामार्ग चंदगड तालुक्याच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे डॉ. अनिल गायकवाड व उपस्थित अधिकारी वर्गाच्या लक्षात आणून दिलं. शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जावून गोव्या राज्याला जोडला जाणार आहे. या महामार्गांवर श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी, श्री रेणुकामाता, व पात्रादेवी, हि प्रसिद्ध शक्तिपीठे आहेत. त्यामुळेच महामार्गास शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.
इतर बारा जिल्ह्यातील अनेक प्रसिद्ध शहरे, व्यापारी केंद्रे, देवस्थाने या मार्गामुळे जोडली जाणार आहेत. यामुळे चंदगड तालुक्यातील पर्यटन वाढीस चालना मिळणार असून इतर जिल्ह्यातील वाहतूक व दळणवळण जलदगतीने होणार आहे. हा महामार्ग पुढे जावून गोवा राज्यास जोडला जात असल्याने यांचा मोठा फायदा चंदगड तालुक्यातील जनतेला होणार आहे. चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील हजारो लोक, नोकरी, व्यापारासाठी गोवा राज्यास जातात. या महामार्गमुळे गोव्याचा प्रवास जलदगतीने होणार आहे. या सर्व गोष्टीमुळे चंदगड तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळे प्रकाशझोतात येतील. या पर्यटन स्थळाचा विकास होईल यांचा फायदा येथील स्थानिक शेतकरी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, पोल्ट्री व्यावसायिक, वाहतूकदार यांना मोठ्या प्रमाणात होईल. यासाठी शक्तिपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून जावा असा आग्रह आमदार शिवाजीराव पाटील यांनी लावून धरला आहे.
डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी हि या मागणी बाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातूनच जाण्याची शक्यता वाढली आहे. एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गास विरोध केला आहे. त्यामुळे आ. शिवाजीराव पाटील यांच्या या मागणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
