
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर येथे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक भारताचे कृषीसंत वसंतराव नाईक यांची 112 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरभावनेने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली. यानंतर बोलताना डॉ. मांजरे म्हणाले,
“वसंतराव नाईक हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते. त्यांनी सलग 11 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. रोजगार हमी योजनेचे जनक, श्वेतक्रांती आणि कृषीक्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांनी राज्यातील ग्रामीण व शेती क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा राजा आणि शेतकरी योद्धा ही ओळख लाभली.”
राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवकाची भूमिका त्यांनी निष्ठेने पार पाडली, असेही मत डॉ. मांजरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसंयोजक डॉ. डी. बी. मुळे यांनी मानले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.