
केंद्र सरकारची खास योजना; जाणून घ्या…
केंद्र सरकारने तरुणांसाठी मोठा निर्णय घेत खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारने “रोजगार संलग्न प्रोत्साहन (ELI) योजना” ही एक नवीन आणि क्रांतिकारी योजना मंजूर केली आहे. याअंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून १५ हजार रुपये मिळणार आहेत.
एएलआय योजनेचा (ELI) उद्देश तरुणांना नोकरीसाठी तयार करणे आहे. यासोबतच त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यायचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ELI म्हणजेच “रोजगार संलग्न प्रोत्साहन” योजनेला नुकतीच हिरवा कंदील देण्यात आला. या योजनेअंतर्गत, येत्या दोन वर्षांत ३.५ कोटींहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारने 1 लाख कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे.
पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार १५ हजार रुपये
या योजनेअंतर्गत, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रुपयांपर्यंत मासिक पगार मिळेल. हे पैसे दोन हप्त्यांमध्ये दिले जातील. इतकेच नाही तर तरुणांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून दोन वर्षांसाठी प्रोत्साहन देखील मिळेल. केंद्र सरकार यावर ९९,४४६ कोटी रुपये खर्च करणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा विशेष भर उत्पादन क्षेत्रावर आहे. जेणेकरून तेथे अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करता येतील. याशिवाय, सरकार “टिकाऊ रोजगार” म्हणजेच एखाद्याला दीर्घकाळ नोकरीवर ठेवण्यासाठी देखील मदत करेल. जर एखाद्या कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला २ वर्षांसाठी कामावर ठेवले तर त्याला प्रत्येक कर्मचाऱ्यावर दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.
पैसे कधी मिळणार?
ELI योजनेअंतर्गत, पहिला हप्ता नोकरी मिळाल्यानंतर 6 महिन्यांनी मिळेल. तर दुसरा हप्ता 12 महिने नोकरी पूर्ण केल्यानंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतरच दिला जाईल. या प्रोत्साहन रकमेचा एक भाग एफडी खात्यात ठेवला जाईल. तरुणांना या निधीतून नंतर पैसे काढता येतील. पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसाठी, पैसे थेट त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केले जातील. खाते फक्त आधार कार्डशी जोडलेले असावे. कंपन्यांना प्रोत्साहन रक्कम थेट त्यांच्या पॅन लिंक केलेल्या खात्यात मिळेल.