
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; राज ठाकरेंबाबत म्हणाले…
हिंदी सक्तीविरोधातील सरकारने घेतलेल्या निर्णयाला ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध दर्शविला. मराठी अस्मितेच्या मुद्दावर ठाकरे बंधू एकत्र आले. दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले.
सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत ५ जुलैला एकत्रित मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते.
अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ जून रोजी रात्री हिंदी सक्तीविरोधातील दोन्ही जीआर (अध्यादेश) रद्द करत असल्याचे जाहीर केले. यानंतर आता ५ जुलै रोजी मोर्चा नव्हे, तर विजयी मेळावा होणार असल्याचे उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामना या मृखपत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
या विजयी मेळाव्याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे बंधू पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यांच्या एकत्रित येण्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत असे म्हणत नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. एक्सवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे, तर राज ठाकरे यांना प्रश्न केला आहे.
काय आहे ट्वीट?
उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत.
तसेच, सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली, अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत तोंडसुख घेतले आहे.
शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसवले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती ! असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे आता त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.