
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
मुंबई, दि. १ :- मावळ तालुक्यातील (जि. पुणे) इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी दिली.
या संदर्भात सदस्य अमोल खताळ यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य विक्रम पाचपुते यांनीही सहभाग घेतला.
मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले, इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल धोकादायक असल्याचे घोषित करून त्यावर हा पूल वापरू नये अशा सूचना लावल्या होत्या. मात्र या पुलावर पर्यटकांची गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडून चार व्यक्तींचा मृत्यू झाला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या १६ हजार ३४५ पुलांचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट, दुरुस्ती व सुरक्षिततेचे काम वेळोवेळी होत असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले, राज्यात सध्या चार पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात येत आहे. याशिवाय आणखी आठ पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट प्राप्त होताच त्यांचीही दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी केली जाईल, असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.