
भाजप आमदार प्रसाद लाड यांचं नाव आणि एआय आवाजाचा गैरवापर करून बीड जिल्ह्यात ३ कोटी २० लाखांचा निधी हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रत्नागिरीतील अधिकाऱ्यांना आमदार लाड यांच्या बनावट लेटरहेडवर खोटी सही आणि एआय आवाजाचा वापर करून कोट्यवधींची निधी वळवण्यात आलाय.
ही बाब लाड यांनी स्वत: विधान परिषद सभागृहात सांगितल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.
रत्नागिरी येथील एका अधिकाऱ्याला एआय निर्मित कॉल आला होता. प्रसाद लाड यांच्या आवाजात अधिकाऱ्याला निधी वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी लाड यांचे बनावट लेटरहेड आणि खोट्या सहीचा वापर करण्यात आला. एकूण ३ कोटी २० लाख रुपये वर्ग बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आले.
बीड जिल्हा पुन्हा चर्चेत
बीड जिल्हा गेल्या वर्षभरातून चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ते अनेक घोटाळ्यांपासून अनेक प्रकरणांनी जिल्ह्याचं नाव चर्चेत आलं आहे. आता आमदाराच्या नावाचा गैरवापर झाल्यानंतर चर्चेत आलं आहे. या प्रकरणी ४ जणांची नावे समोर आली आहेत. तसेच यात बंडू नावाच्या सरपंचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
या गैरवापरानंतर आमदार प्रसाद लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. ‘माझ्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करून घोटाळा करण्यात आलाय. बनावट लेटरहेड आणि सहीचा वापर करून निधी चोरण्याचं कृत्य गंभीर आहे, असं लाड यांनी सभागृहात सांगितलं. या घोटाळ्याप्रकरणी प्रसाद लाड यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच त्यांनी पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही माहिती दिली आहे. ‘बीडचे नाव ऐकताच अधिक सावध झाल्याचेही लाड यांनी नमूद केले.