
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
” शब्दांची तलवार उगारावी लागते कधी इतिहास लिहिताना, कारण त्या रक्ताने न्हालेल्या पानांवर स्वाभिमानाची आग असते!”
शौर्य, बलिदान, स्वराज्यनिष्ठा आणि हिंदवी अस्मितेच्या रक्षणासाठी झुंजणाऱ्या मराठा सरदारांचा इतिहास म्हणजे एक जाज्वल्य तेजाची अग्निगाथा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्वप्नासाठी रणभूमीवर तळपणाऱ्या तलवारी, घोड्यांचे गगनभेदी खिळांळणारे आवाज, आणि शत्रूच्या छावण्यांत धडकी भरवणारा भगवा ध्वज या साऱ्यांची साक्ष म्हणजे हे हिंदवी स्वराज्याचे सरदार होय. हिंदवी स्वराज्याच्या असंख्य पराक्रमी वीरांमध्ये सागरी पराक्रमाची सुवर्ण यशोगाथा आपल्या पराक्रमाने लिहिणारे अद्वितीय सरखेल म्हणजे कान्होजी आंग्रे होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या विजयानंतर मराठ्यांचे आरमार स्थापन केले. इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन म्हणतात की, ” मराठ्यांच्याकडे युद्धाची परंपरा असली तरीही समुद्र हा त्यांच्यासाठी एक नवीन पैलू होता. भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजा होते. ज्यांनी नौदलाची स्थापना राजकीय दृष्टीने व दूरदृष्टीने केली होती. ” हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांच्या आरमारचे संस्थापक होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि पराक्रमाने कान्होजी आंग्रे प्रभावित होते. पुढील काळात ते साक्षात स्वराज्याच्या आरामाराचे रक्षक बनून परकीय सागरी सत्तांच्या पुढे वाघासारखे डरकाळी फोडणारे आणि मरणासमोर अभंग उभे राहणारे योद्धे म्हणून नावारूपास आले होते.
पौर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच अशा युरोपीय शक्तींनी भारताच्या किनाऱ्यावर व्यापारानंतर स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करत आपले राजकीय व व्यापारीक वर्चस्व दाखविण्यास सुरुवात केली होती. “हा सागर आमचा आहे. यावर आमचीच मालकी आहे.” असे परकीय सागरी सत्तांना वाटत होते. आमच्या नौदलाचा पराभव कोणीही करू शकणार नाही असा अभिमान पौर्तुगीज व इंग्रजांना होता. परकीय सागरी शक्तीचा हा अभिमान स्वराज्याच्या या योद्धाने आपल्या स्वाभिमानाने फोडला होता. अशा युरोपिय सागरी सत्तांना समुद्री युद्धात धूळ चारून त्यांचा अहंकार नष्ट करणारा वाघ होता. कान्होजी आंग्रे यांच्या सारखे सरदार केवळ तलवारीने अथवा बंदुकीने लढले नाहीत तर चारित्र्याने लढले. महाराष्ट्र धर्मासाठी लढले. त्यांच्या डोळ्यात तेज वागण्यात मर्यादा आणि रक्तात एकच ध्यास हिंदवी स्वराज्याची अखंडता ही होती.
मराठ्यांच्या इतिहासातील आज्ञापत्रात लिहिलेले आहे की, ” आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्याचे अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे. त्याचप्रमाणे ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्यमेव करावे.”
कान्होजी आंग्रे यांचा जन्म इसवी सन 1669 च्या सुमारास झाला असावा असा उल्लेख आढळून येतो. त्यांच्या बालपणातच ब्राह्मणाने त्यांची पत्रिका पाहिली असता त्यांच्यात राजयोग असल्याचे लक्षात आले. याचा अर्थ असा की ते पुढे जाऊन पराक्रमी व्यक्तीमत्व म्हणून उदयास येणार होते.
कान्होजी आंग्रे यांनी बालपणीचे शिक्षण संपवून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर अचलोजी मोहिते यांच्याकडे नोकरीवर होते. त्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी कुलाबाचा आरमार प्रमुख शिधोजी गुजर यांच्या हाताखाली आपल्या आरमारी कार्यास सुरुवात केली. 1694 पासून कान्होजी आंग्रे हे नाव मराठ्यांचा इतिहासात आपल्या कर्तृत्वाने उदयाला येऊ लागले होते.
धर्मवीर संभाजी राजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज स्वराज्याचे भवितव्य आपल्या पराक्रमी सरदारांवर सोडून दक्षिणेकडे जिंजी येथे निघून गेले होते. अशावेळी कोकणातील बेबंधशाहीच्या काळामध्ये परकीय सागरी सत्ता व सिद्दी सरदार यांच्याशी लढा देऊन कान्होजी आंग्रे यांनी महाराष्ट्र धर्म राखला होता.
इ. स. 1694 मध्ये महाराणी ताराबाई यांनी कान्होजी आंग्रेला विजयदुर्गचा सरखेल म्हणून नेमले होते. तसेच ध्वजाधिकारी व सेनाखासखेल यासारख्या बहुमान जनक पदव्या दिल्या होत्या. कान्होजी आंग्रे यांनी आपले मुख्य ठाणे कुलाबा येथे होते. इ. स.1698 मध्ये कान्होजी आंग्रे यांच्याविषयी इंग्लिश दप्तरात उल्लेख असल्याचा आढळून येतो. सिधोजी गुजर यांच्या मृत्यूनंतर मराठा आरमाराची संपूर्ण सूत्रे कान्होजी आंग्रे यांच्या हातात आली होती. इ. स. 1707 मध्ये औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर शाहू महाराज महाराष्ट्रात परत आले होते. तेव्हा महाराणी ताराबाई व शाहू यांच्यात मराठ्यांच्या गादीवरून कलह निर्माण झाला होता. महाराणी ताराबाईचा पराक्रमी सरदार कान्होजी आंग्रे असून युद्धात कोणत्याही क्षणी विजयश्री मिळविण्याचे सामर्थ्य त्यांचात आहे. हे बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी ओळखले होते. त्यामुळे कान्होजीशी युद्ध न करता त्याला शाहू पक्षात आणले होते. या बदल्यात शाहू महाराजांकडून कान्होजी आंग्रेला सरखेल हा किताब तसेच 10 जंजिरे 16 किल्ले व 36 लक्ष उत्पन्नाचा मुलुख मिळाला होता. यावरून कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या राज्यातील किती पराक्रमी सरदार होते याची कल्पना आपसूकच आपणास येते.
“कान्होजी आंग्रे म्हणजे सागर आणि सागर म्हणजे कान्होजी आंग्रे हे समीकरण सुरू झालेले होते.” कान्होजी आंग्रेने आपले आरमार अधिक सशक्त करून सागरावर मराठ्यांचे प्राबल्य निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने तीन गोष्टीकडे लक्ष वळवले होते की, मराठा व्यापारांचे मलबारी चाच्यांपासून पासून करून रक्षण करणे. तसेच कोकणातील प्रजेचे परकीय सागरी सत्तेपासून रक्षण करून आपली अधिसत्ता समुद्रावर अधिक प्रबळपणे प्रस्थापित करणे. त्यासाठी त्यांना अनेक सागरी सत्तांशी संघर्ष करावा लागला होता विधिलिखितच होते.
कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगीजांच्या कार्ताझ प्रमाणे आपले दस्तक लागू केले होते. हे दस्तक म्हणजे सागरी कराची पावती किंवा परवाने होते. दस्तक असलेल्या जहाजांना कान्होजी आंग्रेंच्या आरमाराकडून संरक्षण मिळत असे तसेच दस्तक नसलेले जहाजे ही लुटली जात किंवा त्यांना सागरी युद्धाने बुडवली जात होती. दस्तकाच्या माध्यमातून त्यांनी बराच महसूल गोळा करीत असे हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण होते. त्यातूनच शत्रूच्या उरात धडकी भरविणारे आरमार निर्माण होते. युरोपीयन राष्ट्राचे आरमार प्रबळ सुविधायुक्त असले तरीही कान्होजी आंग्रे यांची युद्धनीती व सागरी गनिमी कावा हे वाखाण्याजोगे होते. युद्धात साम, दाम, दंड, भेद या राजनीती मधील जो उपाय कारगिर ठरेल ते उपाय वापरत असे. इंग्रज, पौर्तुगीज यांनी कान्होजी आंग्रेवर त्याच्या सागरी कृत्यामुळे कितीही आगपाखड केली असली तरीही कान्होजी आंग्रे साहसी कार्यामुळे स्तुतीस पात्र होते. त्यामुळे ज्याचे आरमार त्याच्या समुद्र ही शिवरायांची उक्ती कान्होजी आंग्रे बाबत खरी ठरली होती. कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमामुळे त्यांना ‘समुद्रावरील शिवाजी ‘ असे ओळखले जात होते. Bombay Review व Rise Of Bombay या ग्रंथाचा लेखक Edward याने आपल्या ग्रंथात कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाविषयी लिहिले आहे. तसेच कान्होजी आंग्रे यांचे नाव निघताच “जंगलात जशी चित्त्याला बघून हरणे दबकत हिम्मत हरतात तशी स्थिती सागरी शत्रूंची होऊन जात असे.”असे सुद्धा वर्णन आढळून येते.सरखेल कान्होजी आंग्रे यांनी जवळ जवळ 36 वर्ष आपले कार्य प्रभावीपणे करून मराठ्यांचे आरमार प्रभावी व बळकट करून शत्रूंच्या उरात आपल्या आरामाराचा भय निर्माण केला होता. कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू आजारपणाने 4 जुलै 1729 मध्ये झाला. आपल्या मृत्यूपूर्वी कान्होजी आंग्रेंने सशक्त असे मराठयाचे नौदल निर्माण केले होते. म्हणून असे म्हटले जाते की, “He found it in bricks, he left it in marbles” याचा अर्थ असा की, त्याच्या हाती आले तेव्हा विटांचे होते. तो गेला तेव्हा संगमरवराचे झाले होते.
सरखेल कान्होजी आंग्रे सारख्या सरदारांच्या मस्तकावर शौर्याचा मुकुट होता. आणि ज्यांच्या छातीत कर्तव्याची धग होती. ज्यांच्या भात्यात अखंड स्वराज्य रक्षणाचे बाण होते. अशा पराक्रमी योध्यांचे तेजोमय अस्तित्व मरणामुळे जरी संपले असले तरीही असे स्वराज्य रक्षक योद्धे कधीही मरत नसतात. तर सदैव तेजोमय ताऱ्यासारखे प्रकाशित राहून आपल्या पराक्रमातून समाजामध्ये चिरंतर जिवंत असतात. कान्होजी आंग्रे सारखे योद्धे अनंतात विलीन झाले नसून ते इतिहासाच्या काळजावर सुवर्ण अक्षराने कोरलेले आहेत. अशा स्वराज्य रक्षक आणि तेजस्वी दीपस्तंभांला नतमस्तक व्हावे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
लेखन
डॉ. विजय एस. निमजे
मोबाईल क्र. 8007280264