
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
नातेपुते : संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, दरवर्षीप्रमाणे यंदाही नातेपुते येथील शिवसेना भवन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची होती. याअंतर्गत मोफत तपासणी आणि मोफत औषधे देण्यात आली.
या शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर, कोविड व नेत्र तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे, जखम झालेल्या वारकऱ्यांसाठी बँडेज, मलमपट्टी, तसेच ओआरएसचे पॅकेट्स वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा १० हजारांहून अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती शिवसेनेचे नेते व नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिली.
या सेवेमुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. विशेष म्हणजे, मोबाईल चार्जिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली गेली होती. यामुळे अनेक वारकऱ्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले.
या उपक्रमात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि आरोग्यसेवा देणारे डॉक्टर यांचा मोलाचा सहभाग होता. प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. सोनम दोशी, अनिता ठोंबरे, विद्या भुसारे, सुनंदा इंगोले, अनिता लाडगे, स्मिता ठोंबरे, तसेच भाजपचे नेते मनोज जाधव, तेजस गोरे, शंकर शिंगाडे, विनोद गोरे, घनवट मिस्त्री यांचा समावेश होता.