
राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प, नोकऱ्या गुजरातल्या पळवल्या जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे.
त्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी अस्मितेवरून वातावरण तापलं असतााना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात अमित शहा यांच्यासमोरच जय गुजरातची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभ हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पाडला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचं मनाला लावून घेण्याची गरज नाही. त्याच्यावरून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची गरज नाही. मी शिंदेसाहेबांशी बोलतो. भाषण बघतो. आमच्या सारख्या विधानसभेत २५ वर्ष राहिलेल्या व्यक्तीने पटकन उत्तर देऊन मत व्यक्त करण्यासारखं काही नाही. मी स्वत: एकनाथसाहेबांशी बोलेल. भाषण बोलेल. त्यानंतर मी यावर भाष्य करेल’.
शिंदेंच्या घोषणेवर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एकनाथ शिंदे स्वत:ला मूळचे शिवसैनिक समजतात. ते लोकांना भासवतात. आज अमित शहा यांच्यासमोर लाचार कसे झाले, हे दाखवून दिलं. जय हिंद म्हणणं हे देशावरील प्रेम, जय महाराष्ट्र असं म्हणणं हे महाराष्ट्रावरील प्रेम. मग जय गुजरात? आता हिंदीबरोबर गुजराती शिकावी लागेल, याची सुरुवात करून देत आहेत का? त्यानंतर बाळासाहेबांचे विचार घेऊन जात असल्याचं म्हणता. पण त्यांच्या विचारात जय गुजरात कधीच नव्हतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही जय गुजरात बोलणार नाहीत. त्यांनी लोटांगण घालण्यासाठी वक्तव्य केलं आहे’.