
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/-प्रेम सावंत
गंगाखेड:शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, विविध भागांतून नागरिकांच्या तब्येती बिघडल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु, गंगाखेड नगरपालिकेने अद्याप डास नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शहरातील वसाहती, नाले आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागांत अजूनही फॉगिंग किंवा औषधधूर फवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, ताप, डेंग्यू, आणि अन्य संसर्गजन्य आजारांची प्रकरणं समोर येत आहेत.
दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत, काहींना परभणी, नांदेड, अंबाजोगाईसारख्या शहरांतील रुग्णालयांमध्ये दाखल करावं लागतंय. एवढं सगळं घडूनसुद्धा पालिका अजूनही झोपेत आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अनेक गल्लीबोळांमध्ये नाल्यांत साचलेली घाण, उघड्यावर पडलेली कचऱ्याची ढिगं, व स्वच्छतेचा अभाव यामुळे डासांच्या उत्पत्तीला चालना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर तत्काळ फॉगिंग व औषध फवारणी सुरू करावी. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वाट पाहू नये. अशी नागरिकांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे