
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला असला तरी, मातृभाषा मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय रान अजूनही धगधगत आहे. अशातच व्यावसायिक सुशील केडिया यांनी ‘मराठी भाषा शिकणार नाही, काय करणार बोल?’असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं.
दरम्यान, पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांनी देखील राज ठाकरेंना धमकी दिली आहे.
हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा समोर आल्यानंतर राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याचं ठरवलं, तसेच मराठी भाषिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येलाच फडणवीस सरकारने जीआर रद्द केला. मात्र, त्यानंतर सुशील केडियांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं. तर आज पप्पू यादवनं राज ठाकरेंना धमकी दिली. मनसैनिकांनी या प्रकरणावर ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असं म्हणत आक्रमक भूमिका घेतली.
गेल्या काही दिवसांपासून हिंदी – मराठी वाद चांगलाच चिघळला आहे. यात खासदार पप्पू यादवनं उडी घेतली आहे. पुर्णियाच्या खासदारानं सोशल मीडियावर पोस्ट करत थेट राज ठाकरेंना धमकी दिली आहे. ‘राज ठाकरे यांचे लोक महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करत आहेत. मी राज ठाकरेंना आव्हान देतो, की त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार काढेन’, अशी थेट धमकी त्यांनी दिली.
खासदाराने आपल्या पोस्टमध्ये, ‘आज पत्रकार परिषदेत मी चुकून उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं आहे. खरंतर मी त्यांचं मनापासून आदर करतो. राज ठाकरे भाजपच्या इशाऱ्यावर गुंडागिरी करत आहे, मी त्यांना हे करू देणार नाही. प्रत्येक प्रदेशाचा आदर करायला हवा. पण वारंवार बिहारच्या लोकांवर हल्ला केला तर, आम्ही हे खपवून घेणार नाही’, असं पप्पू यादव म्हणाले. दरम्यान, या प्रकरणानंतर राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं आहे.