
आम्ही एकत्र आलोय…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राजकारण तापलं आहे.
फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधातील मराठी जनतेचा संताप, पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेने (ठाकरे) आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने नमतं घेत दोन्ही शासन निर्णय रद्द केले. त्यामुळे आंदोलनाच्या दिवशी दोन्ही पक्षांनी विजयी मेळावा घेण्याचं ठरवलं आणि आज (५ जुलै) मुंबईतील वरळी येथे विजयी मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मला कल्पना आहे की आज अनेक बुवा, महाराज व्यस्त आहेत. कोणी लिंबू कापतोय, कोणी टाचण्या मारतोय, कोणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत असेल. कोणी रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो. या सगळ्या बोंदूपणाविरोधात माझ्या आजोबांनी (प्रबोधनकार ठाकरे) लढा दिला आहे आणि त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत.
राज ठाकरेंचेही युतीचे संकेत
राज ठाकरे म्हणाले, सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी आपण सर्वांनी सावध राहायला हवं. पुढे काही गोष्टी घडतील, होतील, त्याची मला कल्पना नाही. मात्र, मला वाटतं की ही मराठीसाठीची आपली ही एकजूट कायम राहायला हवी. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा एकदा साकारावं अशी आशा, अपेक्षा व इच्छा मी व्यक्त करतो.