
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारासमोर उगाच फाफटपसारा करणाऱ्या आणि उचापती करणाऱ्या मुलांवर बंदी घालावी व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात दिनांक 5 जुलै 2025 रोजी मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने उदगीर पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले.
उदगीर शहरातील श्यामलाल विद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, विद्यावर्धिनी हायस्कूल, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, हावगीस्वामी महाविद्यालय, उदयगिरी महाविद्यालय अशा प्रमुख शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात काही फाजील व उचापती करणारी मुले मोटारसायकलवरून उगाच थांबत असतात आणि विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार करतात. याबाबत पालकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. यामुळे विद्यार्थिनींसह पालकवर्गात चिंता वाढली आहे.
सद्यस्थितीत लव्ह जिहादसारख्या घटनांत वाढ होत असल्याने मनसे विद्यार्थी सेनेने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस महिला पोलीस अधिकारी तैनात करावेत, तसेच ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. मुलींची छेड काढणाऱ्या व गैरवर्तन करणाऱ्या मुलांवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षण संस्थांच्या प्रवेशद्वारांसमोर थांबण्यास प्रतिबंध करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष संतोष भोपळे, मनविसे शहर सचिव रोहित बोईनवाड, मनसे विभागाध्यक्ष विनोद चव्हाण, शाखा सचिव पंकज गायवाडे, दीपक करक्याळे, अनिकेत कोळी, ओमकार बिरादार, संदेश दापके, करण बुर्ले, शिवम हिबाने, प्रसाद स्वामी, शेल्हाळे राहुल, रितेश राठोड, धोंडीराम पवार, जितू चव्हाण, अतिश पवार यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.