
बाळा नांदगावकरांनी बाळासाहेबांना 13 वर्षांपूर्वी दिलेलं वचन पूर्ण केलंच !
सरकारने महाराष्ट्रातील हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर आयोजित विजयी मेळाव्यानिमित्त तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र, एकाच व्यासपीठावर आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत महाराष्ट्राला संबोधित केले.
यावेळी दोघांनीही भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारे देत मराठी भाषा, मुंबई आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने न पाहण्याचा इशारा दिला.
यावेळी दोघांनीही आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आणि युती करण्याबाबत संकेत दिले. आम्हाला एकत्र आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांनी प्रयत्न केले. त्यांना ही गोष्ट जमली नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट जमली, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आता एकत्र आलोय ते एकत्र येण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरे यांनीही युतीचे संकेत दिले.
दरम्यान, या मेळाव्यामुळे आणि या संकेतांमुळे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 13 वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण झाले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एक ना एक दिवस एकत्र आणणारच असे वचन नांदगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. 2017 मध्ये ABP माझा वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना नांदगावकर यांनी 2013 मध्ये या वचनाबद्दल सांगितले होते.
बाळा नांदगावकर म्हणाले होते की, “मी एकदा बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत विचारण्यासाठी रवी म्हात्रे यांना फोन केला होता. त्यावेळी रवी म्हात्रे यांनी मला सांगितलं की, अरे बाळासाहेबांनी तुला विचारलं. राज साहेबांना विचारलं होतं, अरे बाळा नाही आला का? त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझा नेता हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतानाही माझ्यासारख्याची आठवण काढतो, यापेक्षा आणखी काय हवं, पक्ष सोडून गेलेला माणूस, राज ठाकरेंसोबत गेलेला माणूस असतानाही बाळासाहेबांनी मला विचारलं.”
म्हंटलं मी कधी येऊ भेटायला साहेबांना? तो म्हंटला कधीही ये. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. लिलावती हॉस्पिटलला आमची भेट झाली, 12 मिनिटे चर्चा झाली. शेवटी जाताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, बाळा, राज आणि दादू (उद्धव ठाकरे) एकत्र आले तर बरे होईल ना? त्यावेळी मी त्यांना वचन दिलं, साहेब मी नक्की प्रयत्न करेल. ती आमची शेवटची भेट झाली, अशी आठवण बाळा नांदगावकर यांनी सांगितली होती.
त्यानंतर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. या मेळाव्यामागे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा मोठा वाटा होता. दोन्ही बाजूंनी चर्चांची जबाबदारी याच प्रमुख नेत्यांवर होती. या प्रमुख नेत्यांंनी एकत्र येत चर्चा केली, ठिकाण अंतिम केले, तयारी केली, लोकांपर्यंत हा मेळावा पोहोचवला आणि यशस्वीही करून दाखवला.