
राज्यात एकीकडे हिंदी विरुद्ध मराठी हा भाषिक वाद पेटला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापलं. एकीकडे मराठी अस्मितेचा वाद पेटलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने मात्र शांतपणे आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
कल्याणमध्ये शिंदे गटाने काँग्रेसला खिंडार पाडत शेकडो उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांची जंबो भरती केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून राजकारण तापलेले असताना शिंदे गटाने हिंदी भाषिकांचे मत मिळवण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत शहाड या ठिकाणी शेकडो उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तसेच यामुळे कल्याणच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे आहेत.
एकनाथ शिंदेंचा मतांवर फोकस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जय भारत, जय महाराष्ट्र, जय गुजरात यांनी दिलेल्या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. विशेषतः मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातच नुकत्याच झालेल्या वरळी डोम येथील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यातही मराठी भाषेच्या अवमानावरून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.
उत्तर भारतीय समाजातील पदाधिकाऱ्यांची जंबो भरती
या टीकेला आणि भाषिक राजकारणाला बगल देत शिंदे गट मात्र आपली राजकीय गणितं नव्याने आखताना दिसत आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी शहाड परिसरात काँग्रेसमधील उत्तर भारतीय समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटात सहभागी करुन घेतले आहे. ही उत्तर भारतीय जंबो भरती केवळ स्थानिक पातळीवर नव्हे, तर राज्यभरात राजकीय दृष्टिकोनातून चर्चेचा विषय बनली आहे. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटाकडून ‘हिंदी पट्टा’ अधिक मजबूत करण्याची तयारी सुरु आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून भाषेच्या रणधुमाळीतही आपल्या मतांची बेरीज वाढवण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट दिसत आहे.