
मनसेचे गुप्त मिशन ?
गेल्या आठवड्यात झालेल्या हिंदी सक्तीविरोधातील यशस्वी सभेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विश्वास अधिकच वाढला आहे. या यशानंतर मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे मनसे नेते राज ठाकरेदेखील अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यासाठी मनसेकडून उद्यापासून तीन दिवसांच्या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
या शिबीरासाठी मनसेने आपला बालेकिल्ला असलेल्या नाशिकची निवड केली आहे. नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील कॅमल रिसॉर्टमध्ये मनसेचे तीन दिवसांचे शिबीर होणार आहे. उद्यापासून (१४ जुलै) दोन दिवस हे शिबीर चालणार आहे. राज्यभरातून मनसेचे नेते, पदधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शिबीराला हजर राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सोमवारी सकाळी १० वाजता ‘कपड्यांची बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर रहा’, दोन दिवसांसाठी मुंबईबाहेर कार्यशाळेसाठी जायचे आहे. असे आदेशच राज ठाकरे यांनी जारी केले आहेत.
राज ठाकरे स्वत: या शिबीराला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, दिशा आणि कार्यपद्धती अशा विविध विषयांवर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याच्या संदर्भातही या शिबीरात निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर, या शिबिरासंदर्भात गुप्तता पाळण्यात यावी आणि कुठेही बोलू नका अशी कानउघाडणी राज ठाकरेंनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश देत माध्यमांशी संवाद साधण्यावर कडक निर्बंध घातले आहेत. पक्षातील कोणीही वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये, तसेच स्वतःचे व्हिडिओ किंवा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत, असे त्यांनी बजावले आहे.
विशेष म्हणजे, माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांवर आहे, त्यांनीही राज ठाकरे यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर कोणतीही वैयक्तिक मते मांडण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे.या आदेशामुळे मनसेकडून काहीतरी ‘गुप्त मिशन’ आखले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये यापूर्वीही मनसेचे राज्यस्तरीय शिबीर झाले होते. आता पुन्हा एकदा नाशिकचीच निवड झाल्याने या शिबिराभोवती राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करायची की नाही, याबाबत राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.