
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आमदार जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त शनिवारी दुपारी समाजमाध्यमांवरून पसरले. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्याजागी शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याच्या पोस्ट फिरू लागल्या.
यादरम्यान, जयंत पाटील, खासदार विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांचे एकत्रित छायाचित्र व्हायरल झाल्याने जयंत पाटील आता काँग्रेसमध्ये प्रवेश तर करणार नाहीत ना?, अशा चर्चांना उधाण आले.
जयंत पाटील यांनी 10 जूनरोजी पक्षाच्या वर्धापनदिनीच मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा, अशी विनंती केली होती. पवारसाहेबांनी मला बरीच संधी दिली. सात वर्षांचा कालावधी दिला. आता पक्षाने नव्या चेहर्यांना संधी देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते. शनिवारी समाजमाध्यमांवर त्यांच्या राजीनामाच्या वावड्या सुरु झाल्याने त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघासह जिल्ह्यात खळबळ उडाली.
वयाच्या 28 व्यावर्षी जयंत पाटील यांनी इस्लामपूर-वाळवा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. गेल्या 30 वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 1999 ते 2008 या काळात त्यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून नऊवेळा अर्थसंकल्प मांडला. 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर, जयंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद स्वीकारले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकासमंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांनी अनेकदा भाजपसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत आणि पुरोगामी विचार सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा आणि अजित पवार यांची भाजपशी वाढलेली जवळीक, या राजकीय पार्श्वभूमीवर आमदार जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. काँग्रेस हा मोठा जनाधार असलेला पक्ष असून, शेजारच्या कर्नाटकातही काँग्रेसचे सरकार आले आहे. राजकीय स्थिती बदलल्यास जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाऊन मुख्यमंत्री होऊ शकतात, असा तर्क लावला जात आहे.
अजित पवार यांच्याप्रमाणेच जयंत पाटीलही महत्त्वाकांक्षी नेते आहेत आणि मुख्यमंत्री होण्याची त्यांचीही इच्छा आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेल्यास त्यांचे स्वागतच होईल आणि पश्चिम महाराष्ट्रातील या वजनदार नेत्यामुळे काँग्रेसही बळकट होऊ शकते. राज्यात सत्तापालट होऊन काँग्रेसचे सरकार आल्यास जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी
खासदार विशाल पाटील, जयंत पाटील, विश्वजित कदम यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जयंत पाटील काँग्रेसमध्ये येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या सांगली जिल्ह्यात सध्या भाजपा, शिवसेना महायुतीचे प्राबल्य वाढले आहे. आमदार जयंत पाटील काँग्रेसमध्ये आल्यास जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते.