
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजयी मेळाव्यानंतर सातत्याने युतीबद्दल चर्चा होत आहेत. मात्र, अद्यापही ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चाबाबत संभ्रम आहे.
याच दरम्यान, राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे झालेल्या त्यांच्या पक्षाच्या शिबिरात पत्रकारांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचे विधान केले असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
यावर आपण असे काहीच बोललं नसल्याचे राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी माध्यमांच्या वार्तांकनावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता राज ठाकरे यांच्या पोस्टवर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
पोस्टमध्ये राज ठाकरे काय म्हणाले?
मुंबईत झालेला मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता, असे विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. यासंबंधी काही माध्यमांनी वृत्त देखील दिले. यानंतर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, असा आरोप केला आहे.
संजय राऊतांचे सूचक विधान
त्यांच्या पोस्टनंतर आता संजय राऊत यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात सातत्याने प्रश्न विचारण्यापेक्षा महापालिका निवडणुकीनंतर काय होतं ते तुम्हाला दिसेल. राज ठाकरे यांची एक मी पोस्ट वाचली. ती वाचल्यावर त्यातले अर्थ आणि संदर्भ तुम्हाला कळायला हवे, असे सूचक विधान केले आहे.
युतीच्या चर्चांना उद्धव ठाकरेंकडून उभारी
नुकताच सामानाच्या मुलाखतीचा टीझर समोर आला आहे. सामानाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्यांंवरून प्रश्न विचारले आहेत. या टीझरमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
समाजाच्या हितासाठी आम्ही करत आहोत, आमच्या आजोबांपासून नंतर शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे, ” असे विधान करून उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उभारी दिली आहे.