
आंबेडकर-शिंदेंच्या युतीनंतर; वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय…
वंचित बहुजन आघाडीने आज मोठा राजकीय निर्णय घेत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेशी आपले सर्व संबंध तोडले आहेत.
यापुढे त्यांना कोणताही पाठिंबा दिला जाणार नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं आहे. याप्रकारचं अधिकृत निवेदनच वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलं आहे.
वंचितच्या निर्णयामागे कारण काय?
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऑनलाईन राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागचं प्रमुख कारण म्हणजे रिपब्लिकन सेनेने भाजप-शिवसेना शिंदे गटाशी केलेली युती. वंचित बहुजन आघाडीच्या मते, आरएसएस-बीजेपी ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. त्यांचं अधिष्ठान ‘सनातन वैदिक धर्म’ आहे, तर फुले-शाहू-आंबेडकर चळवळ संत परंपरेतील ‘हिंदू धर्मा’वर आधारित आहे. या दोन विचारधारा कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, असं वंचितने ठासून सांगितलं.
संविधान बदलण्याची भाषा
आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असले तरी, त्यांनी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या शक्तींच्या बाजूने उभं राहणं दुर्दैवी आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी असलेली पूर्वीची राजकीय आघाडी आणि पाठिंबा आजपासून मागे घेत आहोत, असं जाहीर विधान वंचितकडून करण्यात आलं. आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीने अनेक निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता, मात्र आता या निर्णयामुळे त्यांच्या युतीचं पूर्णपणे समापन झालं आहे.
आनंदराज आंबेडकर की संविधान?
वंचित बहुजन आघाडीकडून फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणी मानणाऱ्या तमाम जनतेला आवाहन करण्यात आलं आहे की, आनंदराज आंबेडकर की संविधान? असा निवड करण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडीने यामध्ये संविधानाच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. फुले शाहू आंबेडकरी जनतेने आपला निर्णय घ्यावा, असं आवाहन या निवेदनात करण्यात आलंय. या बैठकीत रेखाताई ठाकूर, ऍड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अशोकभाऊ सोनोने यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपला ठाम पाठिंबा या निर्णयाला दर्शवला.