अजितदादांचे सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचे आदेश !
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना मोठा दणका बसला आहे. लातूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यासमोर ‘छावा’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे-पाटील यांनी पत्ते टाकले. त्यानंतर सूरज चव्हाण यांनी विजयकुमार यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ते ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.
अजित पवारांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘ही अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह घटना आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो.
मारहाणीवर सूरज चव्हाण काय म्हणाले?
छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.
