
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपत आहे. मात्र आता पुढचा विरोधी पक्षनेता कोण असा प्रश्न सर्वांपुढे उपस्थित झाला आहे. विधानपरिषदेत सर्वाधिक संख्या सध्या काँग्रेस पक्षाची आहे.
मात्र तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कमी मत पडली आणि त्यामुळे पुरेसं संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेता देता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं. मात्र हा नियम कुठेही लिखित नाही असं पत्र महाविकास आघाडी नेत्यांकडून विधानसभा अध्यक्ष यांना पाठवण्यात आलं होतं. परंतु आपण यावर विचार करू, असं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलं आहे.
महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिकामोर्तब करून ते पत्र विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सोपवलं आहे. या पावसाळी अधिवेशनात देखील एक स्मरणपत्र देण्यात आलं असून स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.
विधानसभेत जर शिवसेना आपल्या विरोधी पक्षांनी देणार असेल तर विधानपरिषदेत काँग्रेस पक्ष आपल्या विरोधी पक्षनेता बसलेली महाविकास आघाडीमध्ये आधीच ठरलं आहे. विधानपरिषदेत आपण महाविकास आघाडीचा बलाबल पाहिलं तर काँग्रेस सात आमदारांवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे देखील 7 आमदार आहेत. मात्र अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने ही संख्या 6 येते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडे केवळ तीन आमदार विधानपरिषदेत आहेत.
संख्याबळ पाहता काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळे अर्थातच काँग्रेस या पदासाठी दावा करणार. मात्र जर विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानपरिषदेत आपला विरोधी पक्षनेता बसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनिल परब यांचं नाव चर्चेत?
काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा विरोधी पक्षनेते पदासाठी सुरू असताना दुसरीकडे अनिल परब यांचे देखील नाव या शर्यतीत पुढे आलं आहे. अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब तुम्ही तयारीला लागा असं म्हणत अनिल परब यांना देखील तयारी हे संकेत दिले आहेत. जरी हे वक्तव्य खेळीमेळीत घेऊ असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं असतं तरी आता मात्र शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष वरच्या सभागृहात आपला विरोधी पक्षनेता बसवण्याच्या तयारीत दिसून येत आहे.