
मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटलांमध्ये रंगला कलगीतुरा !
सांगलीत कार्यक्रमाला उशिरा येण्यावरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला.
खासदार एक तर मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडे यांच्या दौडीत गेल्याने उशीर आले, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना चिमटा काढला. यानंतर विशाल पाटील यांनी संधी साधत चंद्रकांतदादांप्रमाणे आम्हालाही वेळेत कार्यक्रमाला जाण्याची सवय लावून घ्यावी लागेल, असा टोला लगावला.
विशाल पाटील कदाचित मॉर्निंग वॉकला किंवा…
सांगलीत धर्मादाय आयुक्त यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या मोफत महा आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील उशिरा आले. यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटील कदाचित मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडेंच्या दौडमध्ये गेले असतील असा चिमटा काढला. चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलताना खासदार विशाल पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील वेळेत कार्यक्रमावर पोहोचतात, आता आम्हालाही वेळेत कार्यक्रमाला जाण्याची सवय लागून लावून घ्यावी लागेल असं म्हणत उशिरा आल्याबद्दल सर्वांची खासदार विशाल पाटील यांनी माफी मागितली. त्यामुळे कार्यक्रमाला उशिरा येण्याच्या निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला दिसून आलं.
केंद्राच्या मदतीने मोठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रवर आता आलेले संकट हे कुणाच्याही हातात नसलेले संकट आहे. आतापर्यंतच्या संकटात महायुतीने कुणालाही वाऱ्यावर सोडलेले नाही. त्यामुळे या ही संकटात केंद्राच्या मदतीने मोठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील पूर परिस्थिती आणि त्याने झालेले नुकसान पाहता आता मोठे कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही सांगलीत एक ऑक्टोबर रोजी घेणारी इशारा सभा ही ऑनलाइन पद्धतीने घेता येईल का? याबाबत आम्ही विचार करत आहोत, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना दसरा मेळावा घेणारच आहेत असे म्हणत आहेत, या विचारलेल्या प्रश्नांवर अशा परिस्थितीत मोठे कार्यक्रम घ्यावे की नाही हे त्यांनी ठरवावे असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.