
खासदार प्रतिभा धानोरकर यांचे स्वप्न अपूर्ण !
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (सीडीसीसी) सात दशकांच्या इतिहासात प्रथमच भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे.
अध्यक्षपदी रवींद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची अविरोध निवड झाली आहे. या विजयाने भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष केला. भाजपच्या एकहाती यशानंतर नेत्यांनी “राज्यात देवेंद्र तर जिल्हा बँकेत रवींद्र विराजमान” असल्याचे सांगत, येत्या काळात शेतकरी, गोरगरीब आणि महिला बचत गटांसाठी प्रभावी कार्य सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.
अविरोध निवडीमुळे विरोधकांचे मूक समर्थन स्पष्ट
17 संचालकांचा पाठिंबा मिळविल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवारांची निवड अविरोध होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. आज मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत, अध्यक्षपदासाठी रवींद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी संजय डोंगरे यांचे नामांकन आले. विरोधी गटाकडून कोणतेही नामांकन दाखल न झाल्याने दोघांची निवड अविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि सत्कार
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर बँकेसमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. यानंतर नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचा सत्कार मा. स. कन्नमवार सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आ. कीर्तिकुमार भांगडिया, आ. किशोर जोरगेवार, आ. करण देवतळे, माजी मंत्री रमेशकुमार गजभे, माजी आ. संजय धोटे, व इतर भाजप नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या संचालकांचा छुपा पाठिंबा?
भाजपाच्या गटाला काँग्रेसच्या काही संचालकांचा गुप्त पाठिंबा असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. सत्कार समारंभात काँग्रेसचे बहुतेक संचालक अनुपस्थित होते. मात्र, त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात आ. भांगडिया यांचा सत्कार करून आपला पाठींबा अप्रत्यक्षपणे दर्शविला.
खासदार प्रतिभा धानोरकर यांचे स्वप्न अपूर्ण
सुरुवातीला काँग्रेसकडे 12 आणि भाजपकडे 9 संचालक असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अध्यक्षपदाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, रवींद्र शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याने त्यांचा भाजपकडे कल झुकला आणि काँग्रेसचे गणित कोसळले. परिणामी, धानोरकर यांचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची चर्चा रंगली आहे.
एसआयटी चौकशी थांबणार का?
काही महिन्यांपूर्वी बँकेतील नोकरभरतीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. त्यावर एसआयटीमार्फत चौकशी सुरू झाली होती. ८ जुलैरोजी ही एसआयटी गठित करण्यात आली. मात्र आता राज्यात, केंद्रात आणि बँकेत भाजपाची सत्ता आल्याने, ही चौकशी थांबणार का?, असा प्रश्न उमेदवार व नागरिकांमध्ये विचारला जात आहे.