
मुश्रीफांनी अश्वमेध तर शिंदेंकडून लाडक्या चिवटेंसाठी फिल्डिंग…
पुणे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी बाकी असला तरी या मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुकांच्या जोडण्या सुरू झाल्या आहेत. पुणे मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.
या निवडणुकांसाठी अद्याप महायुतीत जागा वाटपाचे सूत्र ठरले नसले तरी पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी तर शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आतापासूनच या दोन निवडणुका किती अटीतटीच्या होतील याची झलक पाहायला मिळत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे आहे. तर महायुतीत ही जागा यापूर्वी भाजपकडे आहे. पण याच मतदारसंघावर आता शिवसेनेने डोळा ठेवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विश्वासू समजले जाणारे मंगेश चिवटे यांनी या मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात शिक्षकांचा मेळावा घेऊन त्यांनी लढण्याची संकेत दिले आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघात गतवेळी काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी अपक्ष दत्तात्रय सावंत व भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून विधिमंडळ गाठले होते. त्यावेळी त्यांना एकसंध राष्ट्रवादीची साथ होती. निवडणूक डिसेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.
आता दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघात हा विकास आघाडीच्या गोटात अद्याप शांतता असली तरी महायुतीकडून राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैय्या माने यांनी मतदार नोंदणीला प्रारंभ केला आहे. या सोहळ्या वेळी मंत्री मुश्रीफ यांनी आपण या निवडणुकीत आपला अश्वमेध भैया माने यांना उतरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपने या दोन्ही मतदारसंघासाठी दावा केला असला तरी वरिष्ठांच्या निर्णयावरूनच होणार असल्याचं स्पष्ट केला आहे. शिवाय माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी देखील आपण अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याचं स्पष्ट केले आहे.