
सतेज पाटलांची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात ?
काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
राहुल पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र, पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा काँग्रेसला अधिकच अडचणीत आणणारा आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसू शकतो. करवीर विधानसभा मतदारसंघात राहुल पाटील आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना मानणारा मोठा गट आहे.
शिवाय गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदार चंद्रदीप नरके आणि पाटील गटात राजकीय वैर आहे. महायुती म्हणून या दोन गटाचे मनोमिलन करणे मोठे आव्हान असणार आहे. पूर्वी करवीर आणि सांगरूळ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत आमदार पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे.
त्यानंतर हे दोन्ही मतदारसंघ एकत्र झाल्याने करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले जवळपास 20 ते 25 वर्ष आमदार नरके विरुद्ध पाटील गट असा एकमेकांच्या विरोधात आहे आजपर्यंत पी.एन पाटील यांचा गट आणि काँग्रेसचा निष्ठावंत गट यांनी कधीच शिवसेनेला मदत केली नसल्याचा इतिहास या मतदारसंघात आहे.
सध्या राहुल पाटील हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस वाट धरत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातील गावागावात असलेला नरके विरुद्ध पाटील गट यांच्यात मनोमिलनाचे मोठे आव्हान महायुती म्हणून राहुल पाटील यांच्यासमोर असणार आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेचे आमदार आहेत.
पुढील वर्षी त्यांची मुदत संपणार आहे. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समितीवर वर्चस्व राखण्याचे मोठे आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर असताना राहुल पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय ताकद पाहिली तर करवीर तालुक्यातील 12 पैकी सहा जिल्हा परिषद मतदारसंघात राहुल पाटील यांची ताकद अधिक आहे.
गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारा वर्ग अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच जिल्हा परिषदेच्या सहा मतदारसंघात राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे काँग्रेसला अडचण ठरू शकते. त्याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते.
करवीर तालुक्यात नव्याने तयार करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत. तर जवळपास 24 पंचायत समिती आहेत. त्यातील पाच ते सहा जिल्हा परिषद मतदारसंघ हे दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात. तर उर्वरित पाडळी खुर्द, सांगरूळ, सडोली दुमाला, निगवे खालसा, वडनगे, शिये जिल्हा परिषद मतदारसंघ करवीर विधानसभा मतदारसंघात येतात.
त्यातील वडणगे, शिये, निगवे खालसा आधी गन आणि गट मतदारसंघात नरके गटाची ताकद आहे. तर पाडळी खुर्द, जुना सांगरूळ, सडोली दुमाला निगवे खालसा या मतदारसंघात राहुल पाटील यांच्या गटाची ताकद निर्णायक आहे. त्यामुळे काँग्रेसला करवीर विधानसभा मतदारसंघातून अधिक फटका बसू शकतो.
महायुती म्हणून या पक्ष प्रवेशाकडे पाहिल्यास त्याचा अधिक फायदा हा शिवसेनेला होऊ शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढायचे झाल्यास वर कधीही शिवसेनेच्या पाठीमागे न राहिलेल्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना नरके गटाच्या मागे उभे राहावे लागणार आहे. त्याचा फायदा थेट करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला होणार आहे.