
आमदार रोहित पवार वक्तव्यावर ठाम !
पिंपरी-चिंचवड येथे गुरुवारी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या मेळाव्यात आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि पोलीस प्रशासनावर थेट निशाणा साधला.
सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकले जात नाहीत, सत्ताधाऱ्यांचेच म्हणणे चालते. पोलिस ठाण्यांतही सामान्यांची दाद लागत नाही. अधिवेशनात मोठे नेते पत्याचा खेळ खेळतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित करतात. हे उघड केल्यावरच माझ्यावर एफआयआर दाखल झाले, असं ते म्हणाले.
ईडीला घाबरलो नाही, मग पोलिसांना का घाबरू ?
माझ्यावर दोन ते तीन कारवाया झाल्या आहेत, पण मी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी)ही घाबरलो नाही. मग पोलिस गुन्ह्यांना का घाबरू? सरकारविरोधात बोललं की कारवाया सुरू होतात, असा आरोपही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीवर संशय
विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा आणि धर्मवाद वापरला गेला. मतदान यंत्रांमध्ये गडबड झाली असल्याची शंका अनेकांना आहे. मलाही कर्जत-जामखेडमधून काट्यावरूनच विजय मिळवावा लागला. निकालानंतर भाजपमध्येही उत्साह नव्हता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
पिंपरी महापालिकेतील कंत्राटांवर टीका
महापालिकेतील कंत्राटे सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांना मिळतात. याविरोधात संघर्ष करावा लागेल. संघर्ष करताना गुन्हे लागले तरी पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असं आश्वासन त्यांनी दिलं.
गटबाजी सोडून काम करा, पवारांचा सल्ला
महापालिका निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, गटबाजी सोडावी. जुन्यांनी आणि नविनांनी एकत्रितपणे लढा दिला तरच बदल घडेल, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.