
उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी 25 मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली.
बाळासाहेबांच्या खोलीत जात त्यांच्या आसनाला अभिवादन केले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी वापरलेल्या एका शब्दामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते धास्तावले आहेत.
राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या…’
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवसेना पक्षप्रमुख’ हा शब्द वापरल्याने एकनाथ शिंदेंच्या पक्षातील नेते आक्षेप घेतला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या, ‘राज ठाकरे यांना माहिती आहे की दोन शिवसेना आहेत. शिवसेना युटीबी आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह माननीय कोर्टाने एकनाथजी शिंदे यांना दिलेलं आहे.
राज ठाकरे शुभेच्छा द्यायला गेले पण नंतर विषय चालू होतात. खरं महाराष्ट्रात खूप काही गोष्टी बोलण्या सारख्या करण्या सारख्या गोष्टी आहेत. बऱ्याच समस्या आहेत परंतु दोन भाऊ एकत्र आले तर कुठली मोठी राष्ट्रीय समस्या सुटली आणि ती संपुष्टात आली. किती लोकांना यामध्ये रस असले. पाच जुलैला लोकांनी पाहिला सोहळा. आता पुन्हा पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणून त्यात चर्चा करण्यासारखे काही नाही. महायुती भक्काम आहे.’, असे देखील मनिषा कायंदे यांनी सांगितले.
राज यांच्याकडून शिंदेंची कोंडी?
राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख करत एकनाथ शिंदेंची कोंडी केल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे. तर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे आहे आणि चिन्ह मशाल आहे. तरी सुद्धा राज यांनी शिवसेना प्रमुख असा उल्लेख करत खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची असल्याचे सुचित केल्याचे मानले जात आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधुंची युती झाली तरी खऱ्या शिवसेनेच्या मुद्यावर राज ठाकरे एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याची देखील शक्यता आहे.