
पती प्रांजल खेवलकरसाठी रोहिणी खडसेंची खास पोस्ट !
पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यातआ आली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे यांचे प्रांजल खेवलकर हे पती असून यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रांजल खेवलकर हे देखील असून त्यांना कालपासून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावरुन आता रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार गटाच्या महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर संयम राखण्याचे देखील सांगितले आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र! अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या प्रकरणावर रोहिणी खडसे यांचे वडील एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून घडलेला प्रकार हा षडयंत्र असेल तर आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा दिला आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काहीतरी घडू शकते याचा अंदाज मला येत होता. पुण्यामध्ये जी घटना घडली आहे, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. माझे त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणे झालेले नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन कधीही करणार नाही,’ अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी घेतली.
पुढे ते म्हणाले की, पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही. अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर जावई असो किंवा कुणीही असो त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही सहन केले जाणार नाही.” असा सूचक इशारा देखील शरद पवार गटातील एकनाथ खडसे यांनी दिला आहे.