
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात झालेले हल्ले, पळून गेलेले दहशतवादी, पोटा कायद्याचा उल्लेख करत त्यांनी निशाणा साधला.
यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी यांनीही चॅलेंज दिले. त्यांच्या भाषणातील मुद्द्यांवर विरोधकांनीही अनेकदा आक्षेप घेतले. त्यामुळे संसदेत आज घमासान पाहायला मिळाले.
काँग्रेस सरकारने 2004 मध्ये मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पोटा कायदा रद्द केला. कुणाच्या फायद्यासाठी हे केले, असा सवाल अमित शहांनी केला. हा कायदा रद्द झाल्यानंतर 2005 मध्ये अयोध्येत रामलल्लाच्या टेंटवर हल्ला झाला. 2006 मध्ये मुंबईत ट्रेनमध्ये हल्ला, उधमपूरमध्ये हिंदूंवर हल्ला, हैद्राबाद, उत्तरप्रदेश, रामपूर सीआरपीएफ कँप, श्रीनगर आर्मीवर हल्ला, जयपूर, अहमदाबाद, दिल्ली, पुण्याती जर्मन बेकरी, वाराणसी, मुंबई हल्ला या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख अमित शहांनी यावेळी केला.
दहशतवादाविरोधात लढाई होत असते. काँग्रेस सरकारच्या काळात 2005 ते 2011 पर्यंत 27 दहशतवादी हल्ले झाले. जवळपास 1 हजार लोक मारले गेले. तुम्ही काय केले? उत्तर द्या. राहुल गांधी मी चॅलेंज देतो. या दहशतवादी हल्ल्यांविरोधात तुमच्या सरकारने जी पावले उचलली, त्याबाबत देशातील जनतेला इथे उभे राहून सांगावे, असे चॅलेंज अमित शहांनी राहुल गांधींना दिले.
दहशतवादाविरोधात काँग्रेस सरकारने काहीच केले नाही. हे इथून दहशतवाद्यांचे फोटो पाकिस्तानला पाठवत होते. आमच्या काळातही हल्ले झाल्याचे ते सांगतात. आमच्या काळात जे हल्ले झाले ते पाकप्रेरित आणि काश्मीरपुरतेच मर्यादीत होते. 2014 ते 2025 पर्यंत देशाच्या अन्य भागात एकही घटना घडलेली नाही. काश्मीरमध्येही आता पाकिस्तानातून दहशतवादी पाठवावे लागतात, असे शहांनी सांगितले.
दहशतवादी पळून गेल्याचा दावा विरोधक करत होते. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिम कासकर, रियाज भटकळ, इक्बाल भटकळ हे सगळे पळून गेले, त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. आता राहुल गांधींनी याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही अमित शाह यांनी यावेळी दिले.