
पुण्यात २६ जुलैच्या रात्री छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलीसांच्या या कारवाईनंतर खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यांच्या या प्रश्नांनावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
पुणे आयुक्त नेमकं काय म्हणाले?
पोलिसांची कारवाई पारदर्शक रित्या, नियमानुसार कायदेशीर रीत्या होईल. जी कारवाई झाली आहे, त्याची विस्तृत माहिती यादी प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेण्याचे कारण नाही. – कुठल्याही प्रकाराची फोटो व्हिडिओ पोलिसांकडून देण्यात आले नाहीत. लोक कोणी फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ काढत असतील, तर त्यावर बंधन आम्ही घालू शकत नाही.
कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ट होती. आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती. आणि आम्ही कारवाई केली या कारवाईबाबत कुणीही मनात शंका घेऊ नका. कुणीही संशय घेऊ नका, आम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो लीक केला नाही. कोणताही व्हिडिओ किंवा इमेजेस पोलिसांकडून लिक करण्यात आले नाहीत. असे पुणे आयुक्तांनी स्पष्ट केले.
खडसेंचे आरोप काय?
पोलिसांच्या कारभाराविषयी माझ्या मनात काही शंका आहेत. तिथे पाच सात जणांची पार्टी चालू होती. तिथे कोणतेही संगीन नाही. नृत्य नाही. कोणताही गोंधळ नाही. एका घरात पाच- सात जण पार्टीत होते. त्याला तुम्ही रेव्ह पार्टी कसे म्हणता? राज्यात कुठेही पाच- सात जण मिळून पार्टी करत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणार का? रेव्हा पार्टीची नेमकी व्याख्या काय ती पोलिसांनी स्पष्ट करावी. त्यामुळे रेव्ह पार्टी आयोजित केली म्हणून माझ्या जावयाची बदनामी करण्याचे प्रयोजन काय? असे सवाल खडसेंनी यावेळी उपस्थित केले.
तसेच, माझ्यावर साध्या वेशातील पोलिस पाळत ठेऊन असल्याचेही खडसेंनी यावेळी दावा केला आहे. माझी पत्रकार परिषद सुरु असताना साध्या वेषातील पोलीस आले. माझ्या घराच्या बाहेर आत्ताही पोलीस आहेत. माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करतायेत. माझा सरकारला सवाल आहे की, माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे? माझा आरोप आहे की रेव्ह पार्टी हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे.